Nashik : पाषाण मंदिरांना संवर्धनाची आस!

Sundarnarayan Mandir
Sundarnarayan Mandir esakal

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोदावरीच्या तीरावर भरणाऱ्या आगामी २०२७-२८ मधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्रातील पाषाण मंदिरांना संवर्धनाची आस लागली आहे. सिंहस्थामध्ये मिळणाऱ्या निधीतून पुरातन वास्तूंचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी होणाऱ्या कामांसाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला पुढचे पाऊल टाकावे लागणार आहे, असे नाशिककरांच्या भावना आहे. (Hope for preservation of stone temples in city before kumbh mela nashik Latest Marathi News)

पुरातत्त्व विभागातर्फे २००० पासून ते २०२२ पर्यंत डागडुजीसाठी उपलब्ध केलेल्या निधीमध्ये नाशिक विभागातील १८ कामांचा समावेश आहे. त्यापैकी २०१६-१७ मध्ये ३ कोटी १२ लाख रुपयांच्या सुंदरनारायण मंदिराचा समावेश आहे. हे काम सुरू असल्याने यंदाच्या वैकुंठ चतुर्दशीला सोमवारी (ता. ७) सुंदरनारायण मंदिरात भाविकांना नतमस्तक होता येणार नाही.

मध्यंतरी कोरोना काळात मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम काहीसे संथ झाले होते. काळ्या पाषाणावर कोरीव नक्षीकाम असलेले हे मंदिर भाविकांना आकर्षित करते. जीर्णोद्धाराच्या कामासाठी दक्षिण भारतातील कारागिरांना नाशिकमध्ये आणले गेले आहे. दिवसाला बारा तास जीर्णोद्धाराचे काम चालत असून दिवाळीच्या सुटीसाठी कारागीर गावाकडे गेले आहेत.

Sundarnarayan Mandir
Nashik : ‘Snapchat’मध्ये विशालने शोधला बग; METच्या विद्यार्थ्याची कामगिरी

मंदिरांचे शहर म्हणून ओळख

नाशिक हे मंदिरांचे शहर म्हणून जगभर ओळखले जाते. पंचवटीतील पौराणिक-ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काळाराम मंदिर हे हे प्रमुख मंदिर. रंगराव ओढेकर यांनी इसवी सन १७८० मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. आजचे काळाराम मंदिर या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. त्याची मुद्रा दास मारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत.

रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करत असतं. रामदास स्वामींना ‘रघूनायका मागणे हेचि आता‘ हे पद येथे सुचले. राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात सीतागुंफा आहे. राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती इथे आहेत. गुहेत शिवलिंग आहे. सरदार नारोशंकर यांनी १७४७ मध्ये नारोशंकर मंदिर बांधले. मंदिरावरील घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. घंटेचा आवाज तीन कोस (दहा किलोमीटर) पर्यंत जातो. १९६९ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे पाणी घंटेला लागले होते.

त्यावेळीपासून गोदावरीला महापूर आल्याचे घंटेला पाणी लागल्यावर मानले जाते. त्याचप्रमाणे इसवी सन १७०० मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी गंगामंदिर बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वात वर्षभर दर्शनासाठी खुले असते. इतरवेळी ते बंद असते. याखेरीज बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्‍वर, एकमुखी दत्त, निळकंठेश्‍वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्‍वर अशी विविध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. पाषाणावर सुरेख कोरीव नक्षीकाम केलेली मंदिरे ही नाशिकची संस्‍कृती मानली जाते. गोदावरीच्या तीरावरील मंदिरांवर वाढलेली झाडे-झुडपे यामुळे मंदिराच्या ठेव्याला ठेच लागते आहे.

ऊनं, वारा, पाऊस याजोडीला गोदावरीच्या पुरात मंदिरांचे नुकसान होते. अशावेळी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी सतत पाठपुरावा नाशिककरांना करावा लागतो. पण गरज आणि उपलब्ध निधी याचे सूत्र काही केल्या अद्याप जुळलेले नसल्याने मंदिरांच्या दुरावस्थेचा प्रश्‍न नाशिककरांपुढे आ-वासून उभा ठाकलेला आहे. मुळातच, पर्यटनाच्या अनुषंगाने रोजगारनिर्मितीचा विचार करताना आध्यात्मिक-धार्मिक पर्यटनाला कधी महत्त्व मिळणार हा खरा प्रश्‍न आहे.

Sundarnarayan Mandir
Wildlife Census : वन्यजीव प्रगणनेला उजाडणार नवीन वर्ष; वनविभागाचा निर्णय

नाशिकचे पौराणिक महत्त्व

प्राचीन काळापासून नाशिकचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पद्मपूर, जनस्थान मुघल काळात गुलशनाबाद झाले. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक म्हणजे नासिका या ठिकाणी कापले म्हणून नाशिक असे संबोधले जाते. दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या काठावरील नाशिकची

वाटचाल तीर्थस्थळ, आध्यात्मिक-धार्मिक मंत्रभूमीकडून सांस्कृतिक, उद्यमनगरीकडे वाटचाल झाली असली, तरीही तीर्थक्षेत्रातील मंदिरांचा लौकिक अजूनही कायम आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात दर बारा वर्षांनी वाढणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येतून त्याची प्रचिती येते.

"सिंहस्थ कुंभमेळ्यात निलकंठेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वरचे ‍त्रिभुवनेश्वर, बल्लाळेश्वर, इंद्राकेश्वर आणि कुशावर्त कुंड या संबंधी स्वच्छता व त्यांचे पुरातन सौंदर्य जतन करून आवश्यक असल्यास डागडुजीचे कामे करण्यात येतील. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कामांची पूर्तता करण्यात येईल. पुरातत्त्व विभागांतर्गत असणाऱ्या पुरातन वास्तूंचे सौंदर्य अबाधित राहील यादृष्टीने खबरदारी घेण्यात येईल. जेणेकरून कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता व नाशिकचे सौंदर्य अनुभवता येईल."

- आरती आळे (सहाययक संचालक, पुरातत्त्व विभाग)

"सुंदर नारायण मंदिर हे पावणेतीनशे वर्षांचे असून त्याच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरु आहे. देवदिवाळी म्हणजेच, वैकुंठ चतुर्दशीला होणारी हरिहर भेट हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. आमची सतरावी पिढी आहे. आमचे सारे कुटुंब या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होते."

- अमेय अच्युत पुजारी (सुंदर नारायण मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी)

Sundarnarayan Mandir
Sakal Sting Operation : ‘शिवशाही’चा प्रवास ठरतो जिवाशी खेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com