
HSC Exam : इंग्रजीच्या पेपरला इंग्रजीच्याच प्राध्यापकांना पर्यवेक्षण! नाशिकमध्ये बारावीच्या बोर्डाचा प्रताप
नाशिक रोड : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात झाली असून, आजच्या दिवशी इंग्रजीच्या पेपरसाठी इंग्रजी शिकविणाऱ्या प्राध्यापकांनाच पर्यवेक्षण देण्यात आल्याचे नाशिकमध्ये उघड झाले आहे. यामुळे या पेपरमध्ये कितपत पारदर्शकता राहिली, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, याची दखल केंद्रप्रमुखांनी घ्यायला हवी होती, असे सांगत आता त्यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचे परीक्षा मंडळाकडून सांगण्यात आले. (HSC Exam English paper supervised by English teachers case of 12th exam Board in Nashik news)
बारावीच्या परीक्षेसाठी मुळात ज्या विषयाचे प्राध्यापक अध्यापन करतात त्या शिक्षकांना पेपरच्या दिवशी सुटी देणे अथवा परीक्षा केंद्राच्या आत येऊ न देणे अपेक्षित असतानाच पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने अनेक शिक्षकांसह पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी इंग्रजीच्या प्राध्यापकांना जबाबदारी दिली होती. सुपरव्हीजनसाठी इंग्रजीच्या प्राध्यापकांना अनेक केंद्रांवर पाठविण्यात आले होते. त्यांनी केंद्रप्रमुखांना ‘आमच्या विषयाचा पेपर असून, आम्हाला सुपरव्हीजन देऊ नका’, असे सांगितले.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत असे सांगत केंद्रप्रमुखांनी बदलाला नकार दिला. नियम माहिती असूनही तो मोडण्यात आल्याचे अनेक प्राध्यापकांनी सांगितले आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
"पर्यवेक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल. उद्यापासून सर्क्युलर काढणार आहे. यात शिक्षकांची चूक नाही. केंद्रप्रमुखांनी यासंदर्भात दक्षता घ्यायला हवी होती. सुपव्हीजन कोणी व कोठे केले, या संदर्भात माहिती मागविली जाईल."
- नितीन उपासनी, बारावी परीक्षा मंडळ
"सुपरव्हीजन दिलेले शिक्षक- प्राध्यापकांना एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये पाठविण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी ओळखीचे नव्हते. विद्यार्थ्यांना मदत करण्याचा विषय येत नाही."
- बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक