esakal | येथे मरण स्वस्त होत आहे! संवेदना हरवल्या..
sakal

बोलून बातमी शोधा

death in yeola

येथे मरण स्वस्त होत आहे! संवेदना हरवल्या..

sakal_logo
By
- संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : उठल्यावर सकाळी मृतांचा आकडा कळतो दोन किंवा तीनचा..., जसजसा दिवस पुढे सरकतो तसे आकडे वाढत जातात अन्‌ सायंकाळी हा आकडा पोहोचलेला असतो सहा ते नऊपर्यंत! येवल्यातील कोरोना बाधितांचे अगदी सहजासहजी जीव जाऊ लागल्याने मृतांचा आकडा शंभरी पार करून गेला असून, येवलेकराची चिंता वाढली आहे.

येथे मरण स्वस्त होत आहे! संवेदना हरवल्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना येवलेकरांच्या नाकीनऊ येत असल्याचे दिसते. येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित केले खरे; परंतु रोजच पाचच्या आसपास मृत्यू होत असल्याने नेमके चाललेय काय, हे कळेनासे झाले आहे. येथील चार ते पाच खासगी हॉस्पिटलमध्येही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामुळे अनेकांना आधार मिळाला आहे. तथापि, अचानक तब्येत खालवून ज्येष्ठ व इतर आजारांचा संदर्भ असलेले रुग्ण मृत होत असल्याने डॉक्टरांसह सर्वच हतबल होताना दिसतायेत. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून एकही दिवस रुग्ण दगावला नाही, असे झाले नाही. शहरातील रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण अल्प असले तरी ग्रामीण भागातून मात्र रुग्ण व मृत वाढले आहेत.

असे वाढले मृत...

३० मार्च रोजी येवल्यात ५९ रुग्ण दगावलेले होते. त्यानंतर एक एप्रिलला ६६ झाल्यावर येथे मृतांचा आकडा वेगाने वाढला असून, सात तारखेला ८२, नऊला ८९, दहाला ९२, अकराला ९३, तेराला १०१ तर आज १०४ वर हा आकडा पोहोचला आहे. रोजच मृत्यूच्या बातम्या येत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह सर्वसामान्य नागरिकही हादरले आहेत. विशेष म्हणजे हे फक्त उपजिल्हा रुग्णालयातील तालुक्यातील आकडे आहेत. याव्यतिरिक्त खासगी दवाखाने, इतर तालुक्यातून येथे उपचार घेणाऱ्यांमधील झालेले मृत वेगळेच असून, हा आकडा दीडशेच्या पुढे असण्याची शक्यता आहे.

बुधवारी तब्बल आठ मृत्यू...

गेल्या दोन ते दोन दिवसांपासून येथील आकडेवारी चिंताजनक होत आहे. मंगळवारी (ता.१३) येथे भाटगाव, देशमाने, नांदगाव, मनमाड, विंचूर व भारम येथील सहा बाधितांचे मृत्यू झाले. आज हाच आकडा आठवर गेला आहे. दिवसभरात मनमाड, धूळगाव, लासलगाव, भिंगारे, सटाणा, अंदरसूल, येवला व एरंडगाव येथील रुग्णांचा मृत्यू झाला असून, येवल्यासारख्या ठिकाणी एवढे मृत्यू होत असल्याने आश्‍चर्य व चिंताही व्यक्त होत आहे. दरम्यान, मंगळवारी येथे १०६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर, आज ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे येथील रुग्ण संख्या दोन हजार ७७४ वर पोचली असून, सद्यस्थितीत ४६८ जण उपचार घेत आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात दाखवणारे रुग्ण उशिराने येथे दाखल झाले होते. अनेक जण लक्षणे दिसू लागली की दोन ते तीन दिवस घरी किंवा स्थानिक डॉक्‍टरांकडे उपचार घेतात. त्यानंतर ऑक्सिजन ८० च्या आसपास आल्यावर आमच्याकडे दाखल होतात. त्यामुळे उपचार करणे अवघड होऊन मृत्यूंची संख्या वाढली आहे. येणाऱ्या अनेक रुग्णांचा स्कॅनचा स्कोर पंधराच्या पुढेच असतो. नागरिकांनी त्रास सुरू होताच तातडीने उपचारासाठी दाखल होणे गरजेचे आहे. येथे ५० बेडची क्षमता असताना ६७ रुग्ण ठेवले असून, एमबीबीएस दोनच डॉक्टर उपलब्ध आहेत. - शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, येवला