चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पतीला जन्मठेप
---
जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल; आरोपीला १० हजारांचा दंडही ठोठावला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी पतीस जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांच्या न्यायालयाने बुधवारी (ता. २१) हा निकाल दिला असून, आरोपीला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
राजेश जगन पावरा (वय २८, मूळ रा. भोईटी, ता. शिरपूर, जि. धुळे, सध्या रा. तळोंदा दिगर,ता. चाळीसगाव) असे शिक्षा झालेल्या दोषी पतीचे नाव आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळोंदा दिगर (ता. चाळीसगाव) येथील एका शेतात आरोपी त्याची पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी (२६ सप्टेंबर २०२३) रात्रीच्या आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा क्रूरपणे खून केला होता. या प्रकरणी शेतमालक रामेश्वर रूपचंद राठोड यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
परिस्थितीजन्य पुरावा ठरला महत्त्वाचा
या अमानवीय गुन्ह्याच्या खटल्यात घटना बघणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित साक्ष, पुराव्यांवर चालला, तसेच मृत व आरोपीची मुले यांनीही सरकार पक्षाच्या युक्तिवादाला दुजोरा दिला नव्हता. असे असतानाही सरकारी अभियोक्ता ॲड. प्रदीप महाजन यांनी सर्व साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी यशस्वीपणे जोडली आणि प्रभावी युक्तिवाद करत उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयात दाखल केले.
चौकट
पुराव्यांच्या आधारे निकाल
न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून आणि दाखल केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपी राजेश जगन पावरा याला दोषी ठरविले. त्यास जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सहायक फौजदार ताराचंद जावळे (पैरवी अधिकारी) यांनी मोलाची मदत केली.