टुडे एक : सेकंडमेन
---
कोट्यवधीच्या मुरुमाची बेकायदा उत्खनन विक्री
भडगावच्या गौणखनिज माफियांचा प्रताप; दोन प्रकरणांत पावणेदोन कोटींचा दंड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२८ : भडगाव तालुक्यातील पिंपरखेड आणि टोंगाव शिवारात विनापरवाना व विना रॉयल्टी मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन आणि साठा केल्याप्रकरणी भडगाव तहसीलदारांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत संशयिताना तब्बल १ कोटी २६ लाख ८८ हजार २४४ रुपये आणि ३५ लाख ४४ हजार ४६२ रुपयांच्या विक्रमी दंडात्मक कारवाईचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून व तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील (गट नं. २८९/२) मधून विनापरवाना (२८४.६५) ब्रास अवैध मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी असलम गुलाम शेख व अल्तमश असलम शेख (रा. मीरा रोड, ठाणे पूर्व) यांना ३५ लाख ४४ हजार ४६२ रुपयांची दंडात्मक रक्कम तत्काळ चलनाने शासनात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात, मौजे टोंगाव (ता. भडगाव) येथील गट नं.( ५६२ )मध्ये पंपाच्या कामासाठी विनापरवाना तब्बल १०६४.४५ ब्रास अवैध मुरूम भराव केल्याप्रकरणी अशरफ खान सखावत खान (रा. भिवंडी, जि. ठाणे) यांना १ कोटी २६ लाख ८८ हजार २४४ रुपयांचा दंड आकारण्यात येऊन या बाबत नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधिताना ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
गौण खनिज माफिया गोत्यात
जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनात भडगाव तहसीलदार शिलत सोलाट यांनी केलेल्या या कारवाईने भडगाव तालुक्यात खळबळ उडाली असून अवैध गौणखनिज उत्खनन, विक्री आणि वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.
चौकट
वसुलीचे टार्गेट जिकिरीचे
तहसीलदारांनी कारवाई केलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये सुरवातीपासूनच स्थानिक पुढाऱ्यांचा ‘सेटलमेंट फॉर्म्युला’ सुरू होता. जेणेकरुन कुठलीच कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी दबाव तंत्राचा वापरही सुरू असल्याने गेल्या चार वर्षांपासून ही कारवाई प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले. संबंधितांनी मुदतीत दंड न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर टाच आणायची प्रक्रिया राबविली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.