
Dusane Crime Case : दुसाने आत्महत्त्येप्रकरणी महत्त्वाचा पुरावा; Video Clip पोलिसांना देणार
नाशिक : नाशिकरोड येथील सराफी व्यावसायिक दीपक दुसाने यांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या केल्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती लागल्याचा दावा दुसाने कुटूंबियांनी पत्रकार परिषदेत केला.
मयत दुसाने यांच्या मोबाईलमधील एक व्हिडिओ क्लिप असून, त्यामध्ये त्यांनी सोने व रोख रक्कम असे सुमारे साडेतीन लाख रुपये दिल्याचे व जाचाला कंटाळूनच आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आहे.
सदरील पुरावा उपनगर पोलिसांना देणार असून, आता तरी कल्याण पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा मयत दुसाने यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केली आहे. (Important Evidence in Dusane Suicide Case Another family claim video clip will give to police nashik crime news)
नाशिकरोड येथील सराफी व्यावसायिक दीपक दुसाने यांनी चोरीचे १० ग्रॅम सोने खरेदी केले होते. याप्रकरणात कल्याण पोलिसांनी दुसाने यांच्याकडून १३ ग्रॅम सोने व २ लाख ९० हजार रुपये वसुल केल्याचा दावा दुसाने कुटूंबिय व ओबीसी सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी केला आहे.
याच प्रकरणातून मयत दीपक दुसाने यांना कल्याण पोलीस व उपनगर पोलिसांकडून त्रास देण्यात आला. पोलिसांच्या जाचाला कंटाळून दीपक दुसाने यांनी २० दिवसांपूर्वी गळफास घेत आत्महत्त्या केली आहे.
याचसंदर्भात मयत दुसाने यांचा आई सुनंदाबाई कमलाकर दुसाने, पत्नी प्रिया दीपक दुसाने, बहिण गायत्री संजय विसपुते व भाचा गोविंद हरिश्चंद्र मोरे व गजू घोडके यांनी पत्रकार परिषदेमध्ये मयत दुसाने यांनी आत्महत्त्येपूर्वीचा व्हिडिओ दाखविला.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
यात मयत दुसाने यांनी, आपल्याकडून ३ लाख ७० हजार रुपयांची वसुली करण्यात आली असून, त्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्त्या करणार आहे. तसेच, याबाबत आपण लिहून ठेवले असून, भाचा व काकांनी याबाबत मला न्याय मिळवून द्यावा असेही या व्हिडिओत म्हटले आहे.
सदरील व्हिडिओ क्लिप ही मयत दुसाने यांच्या मोबाईलमध्ये होती. मोबाईल तपासत असताना सदरील क्लीप हाती लागली. ती तपास कामासाठी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्तांना आपण ती क्लिप देणार आहोत.
तसेच, सदरचा महत्त्वाचा पुरावा असून पोलिसांनी कल्याण पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय देण्याची मागणी दुसाने कुटूंबियांनी केली आहे.