esakal | अनेक गावे हॉटस्पॉट, तरीही नियमांचे तीन तेरा!
sakal

बोलून बातमी शोधा

In rural areas Corona has had a major outbreak

अनेक गावे हॉटस्पॉट, तरीही नियमांचे तीन तेरा!

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : येवला शहरात कोरोनाची (coronavirus) रुग्णसंख्या मर्यादित असली तरी ग्रामीण भागात मात्र मोठा उद्रेक झाला आहे. अनेक गावे हॉटस्पॉट बनली असून, शहराच्या दहापट ग्रामीण भागातील रुग्ण सक्रिय आहेत. तरीही ग्रामीण भागात (rural area) निर्बंधांचे तीन तेरा वाजले आहेत. दुपारी व सायंकाळीही किराणा दुकाने, भाजीपाला व इतर दुकाने सुरू असतात. गृहविलगीकरणातील (Home Quarantine) बाधित गावांत फिरत असल्याच्या तक्रारी होत असून, प्रशासनाने यावर कडक निर्बंध घालण्याची गरज व्यक्त होत आहे. (In rural areas Corona has had a major outbreak)

नागरिकांकडून नियमांची पायमल्ली


येवल्यात बुधवारी ८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. येवला शहरातील केवळ सात जण असून, ग्रामीण भागातील ७४ पॉझिटिव्ह आहेत. असेच चित्र रोजच दिसत आहे. सध्या शहरात सक्रिय २७ रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील हीच संख्या २७२ आहे. यावरून शहरापेक्षा ग्रामीण भाग कोरोनाने वेढल्याने आता प्रशासनाने शहराची काळजी घेतानाच ग्रामीण भागातील २५ वर हॉटस्पॉट गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथे परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्यातील अत्यावश्यक सेवा व दुकानांना सकाळी सात ते अकराची वेळ ठरवून दिली आहे. ग्रामीण भागातील सर्व प्रकारची दुकाने बिनबोभाटपणे सुरू असतात. अनेक जण तर सकाळी दाखविण्यासाठी अकराला दुकाने बंद करतात. पुन्हा सायंकाळी पाचनंतर सुरू करत असल्याची परिस्थिती आहे. ही दुकाने नियोजित वेळेत सुरू राहण्याकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीही प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळेच नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना अटक


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत. या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे. किराणा दुकाने, विविध प्रकारची गॅरेज, पंक्चरची दुकाने, हार्डवेअर मटेरिअलची दुकाने, भाजीपाला दुकाने दिवसभर बिनबोभाटपणे सुरू असतात.


शहरात नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका धरला होता. प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर आदी आजही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करतात. प्रशासनाने काही दुकाने सील केली, तर काहींना आजही तीन ते पाच हजारांची दंडात्मक कारवाई पालिकेच्या माध्यमातून होत आहे. याच पद्धतीची कडक मोहीम ग्रामीण भागातही राबविण्याची गरज असून, असे झाले तरच वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसेल.

In rural areas Corona has had a major outbreak

हेही वाचा: नाशिक महापालिकेला मिळाले लसीचे साडे आठ हजार डोस