नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; 2- 3 दिवसाआड चोरीचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in incidents of bike theft in Nashik city

नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीसह शहराच्या विविध भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विविध पोलिस ठाण्यात दोन ते तीन दिवसाआड एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होत आहे. पोलिस मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहे.

तक्रार पुस्तके फुल्ल, तपास मात्र लागेना

पोलिस विभाग सध्या कायदा- सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करत अन्यच कामांमध्ये अधिक मग्न असल्याने विविध प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरी घटनांचा विचार केला तर प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन ते तीन दिवस आणि एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे केवळ तक्रारीने पोलिस विभागाचे संगणक आणि तक्रार पुस्तक भरली जात आहे, तपास मात्र लागत नाही.

हेही वाचा: Video : सिटी बसमध्ये घुसून महिलेची कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण

दुचाकी सापडली की नाही, या चौकशीसाठी नागरिक पोलिस ठाण्याच्या गिरक्या मारत आहे. त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. असेच काहीसे चित्र भद्रकाली पोलिस ठाण्यातदेखील बघावयास मिळत आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दुचाकी चोरी होत आहे. दोन ते तीन दिवसाआड एक तरी गुन्हा दाखल होत आहे. शुक्रवारी (ता.१२) चक्क पोलिस ठाण्याच्या बाहेरून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार घडला. रात्री बोधलेनगर येथील रहिवासी तरुण मासे घेण्यासाठी फुले मार्केट येथील मासळी बाजारात आला. मासे घेऊन पैसे देत असताना दरम्यान त्याची दुचाकी चोरी झाली. असे प्रकार घडत असताना पोलिस हेल्मेटसक्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरत आहे.

हेही वाचा: लसीकरणासाठी मनपा नागरिकांच्या दारात

नो हेल्मेट- नो पेट्रोलच्या अंमलबजावणीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची विनाकारण नियुक्ती पेट्रोलपंपावर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्रूपीकरण करणारे अनधिकृत फलक काढण्याचे काम महापालिकेचे आहे. फलक काढताना कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच पोलिसांची आवश्यकता भासत असते. असे असताना अनधिकृत फलक काढणे, फलक लावण्याची परवानगी घेणे अशा विविध प्रकारची महापालिकेचे कामेदेखील सध्या पोलिसांकडून केली जात आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढून गुन्हेगारीच्या घटनांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे.

loading image
go to top