फोटो : H33467
‘इंद्रधनुष्य’चे यजमानपद मुक्त विद्यापीठाकडे
१९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नाशिक, ता. २४ : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्या निर्देशानुसार, २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाचा मान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास प्राप्त झाला आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या नियोजनानुसार, १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या मुख्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात राज्यातील २७ विद्यापीठांचे सुमारे १,२०० ते १,३०० विद्यार्थी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने मा. लोकभवनाच्या निरीक्षण व वित्त समितीने नुकतीच विद्यापीठास भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
महोत्सवात संगीत,नृत्य,वाङ्मयीन कला, रंगमंचीय कला आणि ललित कला या पाच प्रमुख कला प्रकारांअंतर्गत विविध २९ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धांचे आयोजन विद्यापीठ मुख्यालयातील पाच विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. सुरेंद्र पाटोळे, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे,ललित कला केंद्राचे संचालक सचिन शिंदे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. दत्ता पाटील,डॉ. नीरज बोरसे, अमोल पाटील, सिद्धांत टाक, मंगेश पवार,केशव चौधरी यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत.