बाटलीत मिळणारे पेट्रोल किती निष्पाप बळी घेणार? 

panchavati burn 5.jpg
panchavati burn 5.jpg

नाशिक : हिंगणघाट येथील घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे पेट्रोलपंपांवरून बाटलीत व डब्यात दिल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनांमुळे हे "पेट्रोल बॉंब' आणखी किती निष्पाप बळी घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

हिंगणघाटसह नाशिकमध्ये पेटवून घेण्याच्या घटनांमुळे प्रश्‍न ऐरणीवर 

नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी एका नवविवाहितेच्या मातेने टोकाचे पाऊल उचलत थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मागील आठवड्यात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे अंकिता पिसुड्डे या तरुण प्राध्यापिकेला रस्त्यात अडवून नराधम विकेश नगराळे याने बाटलीतील पेट्रोल काढून अंकिताच्या अंगावर टाकून जिवंत जाळले होते. पीडित तरुणीवर नागपुरातील खासगी रुग्णालयात सात दिवस उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी झुंज संपली अन्‌ अंकिताची प्राणज्योत मालवली. याच प्रकारची घटना डिसेंबर 2019 मध्ये हैदराबादला घडली होती. एका 27 वर्षीय व्हेटरनरी डॉक्‍टरवर बलात्कार करून पीडितेला पेट्रोल व डिझेल टाकून जाळून मारले होते. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. 

एक धागा समान

या सर्व घटनांकडे बघताना एक धागा समान आहे. डब्यात व बाटलीत दिले जाणारे पेट्रोल एक प्रकारे "पेट्रोल बॉंब'च आहे. कायद्याने बाटलीत किंवा डब्यात पेट्रोल व डिझेल देण्यास मनाई असतानाही नियम धाब्यावर बसवून पंपचालक सर्रास बाटलीत पेट्रोल व डिझेल देतात. याकडे शासनासह पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन पंपचालकांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

"पेट्रोलपंपचालकांवर कारवाई करा' 
अशा घटनांमधील संशयित ज्याप्रमाणे दोषी आहेत, त्याचप्रमाणे पेट्रोलपंपचालकही तितकेच दोषी ठरायला हवेत. बाटलीत पेट्रोल देणे म्हणजे एक प्रकारे संशयिताला पाठबळ देण्यासारखेच आहे. गोळीबाराच्या घटनेत ज्याप्रमाणे आरोपीने पिस्तूल कसे मिळविले, याचा तपास करून पिस्तूल देणाऱ्यावर कारवाई होते, त्याचप्रमाणे पेट्रोलपंपचालकही तितकेच दोषी ठरायला हवेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com