
Inspirational Story : दिव्यांग दीक्षाची जिल्हाधिकारी होण्याची इच्छा! 21 दिवसांतच घेतले ब्रेल लिपीचे ज्ञान
इगतपुरी (जि. नाशिक) : आठव्या वर्षी ब्रेन ट्यूमर झाला. सलग तीनवेळा ब्रेन ट्यूमरची नागपूर येथे शस्त्रक्रिया झाली. आताही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केले आहे. परंतु परीक्षेमुळे एक महिना पुढे शस्त्रक्रिया ढकलली आहे. (Inspirational Story blind student Diksha desire to become collector Learn Braille in 21 days nashik news)
मागील काळात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दृष्टी हळूहळू कमी होत गेली आणि वयाच्या दहाव्या वर्षी दीक्षा काकडे ही शालेय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूर्णतः अंध झाली. शिकण्याची प्रचंड आवड असल्याने खचून न जाता कलेक्टर होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ती समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण, पंचायत समिती इगतपुरी अंतर्गत सामान्य शाळेत सामान्य मुलांबरोबर घोटी येथील शाळेत शिक्षण घेत आहे. ब्रेल लिपी शिकण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागतात. परंतु दीक्षाने २१ दिवसांतच विशेष शिक्षक बाप्पा गतीर यांचे मार्गदर्शन आणि सरावाने ब्रेलचे अध्यापन पूर्ण केले. अपंगत्वाचा बाऊ न करता कुठलीही अधिकची सुविधा न घेता तिने शिक्षण पूर्ण केले.
सध्या ती दहावीची परीक्षा देत आहे. कलेक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दीक्षाला उज्वल भविष्य आणि यशासाठी परीक्षा केंद्रावर गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य एस. ए. पाटील, मुख्याध्यापक झहीर देशमुख व विशेष शिक्षक बाप्पा गतीर यांनी दीक्षाचे स्वागत केले.