उघड्यावरील उच्च दाबाच्या वीजतारांमुळे अपघाताला निमंत्रण | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : उघड्यावरील उच्च दाबाच्या वीजतारांमुळे अपघाताला निमंत्रण

नाशिक : उघड्यावरील उच्च दाबाच्या वीजतारांमुळे अपघाताला निमंत्रण

जुने नाशिक : उघड्यावरील उच्च दाबाच्या वीज तारांचे जाळे लहान मुलांचे कर्दनकाळ ठरत आहे. शॉक लागून जखमी होणे, मृत्यू होणे, असे प्रकार घडत असूनही वीज वितरण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. चार दिवसापूर्वीदेखील बागवानपुरा परिसरात एका लहान मुलाचा वीज तारेचा धक्का लागून अपघात घडला आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. वीजतारा भूमिगत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.शहरात ठिकाणी उच्च दाबाच्या तारांचे जाळे पसरलेले दिसून येत आहे.

विविध प्रकारची कामे करताना उघड्यावरील तारांचा धक्का लागून दुर्घटना घडत आहे. आठ दिवसापूर्वी नाशिक रोड परिसरात एक दहा वर्षे मुलीचा खेळत असताना वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच बागवानपुरा परिसरात पतंग खेळताना एका लहान मुलास वीजेचा शॉक लागण्याची घटना घडली. सुदैवाने त्याचे प्राण वाचले, परंतु हातास गंभीर दुखापत झाली आहे. जुने नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर अशाप्रकारे ठिकठिकाणी तारांचे जाळे पसरले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तारी भूमिगत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज वितरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी बडी दर्गा परिसरातील एका मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला. अशाप्रकारे अनेक भागात शॉक लागून अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दहा दिवसात नाशिक रोड आणि बागवानपुरामध्ये घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. संक्रांत सण अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. सध्या पतंग उडविण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, अशा घटना घडण्याची शक्यता आहे. विविध चौकांमध्ये असलेल्या तारांचे जाळे भूमिगत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

नागरिकांनीही घ्यावी काळजी

काही ठिकाणी उच्च दाबाच्या वीजतारा ज्या दिशेने गेलेल्या आहेत. त्याच दिशेने अनेकांनी घरांच्या गॅलरी काढल्या आहेत. अशावेळी गॅलरीत काम करताना शॉक लागून अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रकार घडलेदेखील आहे. घरांचे बांधकाम करताना गॅलरी वीजतारांच्या दिशेने येणार नाही किंवा संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने बांधकाम करण्याची काळजी नागरिकांनी घ्यावी.

loading image
go to top