सांस्‍कृतिक राजकारणात ‘जयभीम’ मैलाचा दगड | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जयभीम’

नाशिक : सांस्‍कृतिक राजकारणात ‘जयभीम’ मैलाचा दगड

नाशिक : नुकताच प्रदर्शित झालेला जयभीम सिनेमा हा सांस्‍कृतिक राजकारणात मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन अमरावती येथील प्रगतिशील लेखक संघाचे उपाध्यक्ष प्रा. प्रसेनजित तेलंग यांनी केले. शनिवारी (ता. २०) डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेंतर्गत झालेल्‍या व्याख्यान्यात ते बोलत होते. या व्‍याख्यानाचा विषय ‘जयभीम सिनेमाने सांस्कृतिक राजकारणात केलेला हस्तक्षेप’ असा होता. या वेळी प्रा. तेलंग म्‍हणाले, की भारतीय सिनेमा जाती-अंत या विषयाला कधीही प्राधान्य देत नाही. मात्र, अपवादात्मक काही उदाहरणे सांगता येतात. यात १९३६ मध्ये आलेला ‘अछुत कन्या’ त्याचप्रमाणे अलीकडेच आलेले असुरण, करणन, काला, आर्टिकल-१५ अशी मोजकीच उदाहरणे आपल्याला सांगता येतात.

हेही वाचा: औरंगाबाद : नामांकित कंपन्यांच्या बनावट साहित्य विक्री करणाऱ्या...

आंबेडकरी राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरण यातील एक मैलाचा टप्पा म्हणून जय भिम या सिनेमाकडे पाहिले पाहिजे. येथील पुराण स्मृती धर्मग्रंथ महाकाव्य हे सारे शोषणकर्त्यांनी लिहिले. त्यामुळे त्यात सामाजिक जाणीवा, तसेच सामाजिक न्यायाचा अभाव जाणवतो. हा अभाव भरून काढण्यासाठी संवैधानिक मार्गाचा अवलंब करून लढा उभा करता येतो आणि त्याला यशही मिळते, ही शिकवण देणारा हा सिनेमा असल्याचे मत त्यांनी व्‍यक्‍त केले. सांस्कृतिक क्षेत्रातून येणारा फॅसीझम हा अनेक अंगाने माणसाची बुद्धी कलुषित करतो. या कलुषित मेंदूचे लोक विवेकवादी विचाराचा नेहमी बळी घेत आले आहेत. अशा बळी गेलेल्या मोठ्या प्रदीर्घ परंपरेचा त्यांनी या वेळी आढावा घेतला. मात्र, इथून पुढे असे अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा नवी दिशा दाखविणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य प्रगतिशील लेखक संघातर्फे हे व्‍याख्यान झाले. व्याख्यानमालेचे समन्वयक अमित जोजारे यांनी प्रास्ताविक केले. प्रगतिशील लेखक संघाचे नाशिक जिल्हा सचिव प्रल्हाद पवार यांनी संघटनेचा व वक्त्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमाला निमंत्रक श्यामला चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर राकेश वानखेडे यांनी आभार मानले.

loading image
go to top