धुळे ः टुडे २ साठी
--
फोटो क्रमांक ः 34297
पंढरपूर : जैन पब्लिक ट्रस्टतर्फे पालवी प्रकल्पाच्या नवनिर्मित कक्षाचे उद्घाटन करताना मान्यवर.
--
जैन ट्रस्टचे निवासासाठी अर्थसहाय्य
-
बाधित, वंचित मुलींना आधार; पालवी प्रकल्पासाठी मदत
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ : येथील स्व. रतिबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग व अनाथ कल्याण निधीअंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याच सामाजिक जाणीवेतून पंढरपूर येथील एड्स बाधित मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि निवासव्यवस्थेसाठी कार्य करणाऱ्या पालवी प्रकल्पाला या जैन ट्रस्टमार्फत अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले असून, नुकतेच तेथील नवनिर्मित कक्षाचे उद्घाटन पार पडले.
पंढरपूर येथील पालवी प्रकल्पाच्या अध्यक्षा मंगला शहा यांनी एड्स बाधित मुलींच्या पुनर्वसनासाठी जैन ट्रस्टकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला होता. यातील कागदपत्रांच्या छाननीनंतर ट्रस्टने एका नवीन खोलीच्या बांधकामासाठी टप्प्याटप्प्याने बारा लाख रुपयांची मदत देण्याचे निश्चित केले. ट्रस्टच्या अटीशर्तींची पूर्तता झाल्यानंतर या नवीन रूमचे बांधकाम पूर्णत्वास आले. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते या नवनिर्मित कक्षाचे उद्घाटन झाले. या मदतीबद्दल मंगला शहा यांनी आभार पत्रात जैन ट्रस्टच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
स्व. रतिबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्टतर्फे धुळ्यासह राज्यभरात विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. मतिमंदांसाठी सन्मती विद्यालय आणि मतिमंदांच्या शाळेअंतर्गत मोफत होमिओपॅथी उपचार कक्ष, तसेच जो. रा. सिटी हायस्कूलमध्ये सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. राशिन (जि. अहिल्यानगर) येथील पारधी समाजाच्या मुलांसाठी शालेय बस, छत्रपती संभाजीनगरच्या आरंभ संस्था संचलित गतिमंदांच्या दोन खोल्यांसाठी अर्थसहाय्य देण्यात आले आहे. गेवराई येथील अनाथाालयाला आर्थिक सहकार्य, तसेच धुळ्यातील समर्पण संस्थेत दाखल होणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील दिव्यांग मुला- मुलींच्या आरोग्य संवर्धनासाठी दर तीन महिन्यांनी ठराविक रकमेची देणगी दिली जाते. या ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांची व्याप्ती सतत वाढवली जात असून, या कार्याबद्दल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रा. डॉ. न. म. जैन, प्रभारी कार्यकारी विश्वस्त प्रा. डॉ. संजीव जैन, विश्वस्त जयंत शहा, सुनील जैन यांची प्रशंसा केली जात आहे.