टुडे एक, ॲंकर
(पाऱ्याचे चित्र वापरता येईल)
--
प्रारणोत्सर्जन शीतलनामुळे थंडीच्या तीव्रतेत वाढ
तापमानाचा पारा १२ अंशांपर्यंत खाली येणार; हंगामी संक्रमणाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जिल्ह्यात उद्यापासून (ता.१५) ते २० नोव्हेंबर या कालावधीत हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. आकाश बहुतांशी निरभ्र असेल. दिवसा कमाल तापमान साधारण ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. रात्री आणि पहाटे किमान तापमान हळूहळू घसरत जाईल. एकोणीस नोव्हेंबरपर्यंत किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा अनुभव अधिक तीव्र होईल.
थंडी वाढण्यामागे मुख्य तांत्रिक कारणे अशी आहेत. दिवस लहान होत असल्याने सूर्याची उष्णता कमी प्रमाणात जमिनीवर पडते. आकाश स्वच्छ असल्याने रात्री जमिनीतून साठलेली उष्णता सहज बाहेर पसरते. याला प्रारणोत्सर्जन शीतलन (रेडिएटिव्ह कूलिंग) म्हणतात. या प्रक्रियेत ढग नसल्याने उष्णता अडत नाही आणि तापमान वेगाने घसरते. उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेकडून येणारी कोरडी हवा देखील थंडी वाढविण्यास मदत करत आहे. ही हवा महाद्वीपीय प्रदेशातून येत असल्याने ओलावा कमी असतो आणि थंड वाटते.
पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव उत्तर-पश्चिम भारतात अधिक जाणवत आहे. तिथे पर्वतीय भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे थंड हवेचा प्रवाह काही प्रमाणात मध्य आणि पश्चिम भारताकडे येऊ शकतो. मात्र जळगाव जिल्ह्यावर याचा थेट जोरदार परिणाम अपेक्षित नाही. फक्त हवेच्या दिशेतील बदलामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. हे क्षेत्र पुढे मजबूत होत अवदाबात आणि नंतर चक्रीय वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली मुख्यतः दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीकडे प्रभाव टाकेल.
चौकट
रात्री गारवा, दुपारी ऊन
उत्तर महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यात या प्रणालीमुळे पावसाची शक्यता दिसून येत नाही. हवामान कोरडेच राहील. फक्त वाऱ्यांच्या दिशेत हलकेसे बदल होऊ शकतात. एकूणच या कालावधीत जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वातावरण स्वच्छ राहिल्याने थंडीचा अनुभव दिवसेंदिवस वाढत जाईल. कमाल आणि किमान तापमानात फरक वाढेल. रात्री गारवा जाणवेल तर दुपारी ऊन पडेल. हा बदल हंगामी संक्रमण आणि स्थानिक हवामान प्रक्रियेमुळे घडत आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.
--------