जळगावात मध्यरात्री गोळीबार
----
प्रियकराच्या भावाने झाडली गोळी; दुचाकीवरील महिला जखमी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : प्रेमसंबंधाला विरोध करत प्रियकराच्या भावाने दुचाकीवरील महिलेवर गोळीबार केला. यात महिलेच्या मांडीत गोळी रुतल्याने ती जखमी झाली. दसऱ्याच्या मध्यरात्री मंगळवारी (ता. २०) ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जुने जळगावातील गोपाळपुरा येथे वास्तव्यास असलेल्या संगीता बुधा बारेला (वय ३५) या खासगी कंपनीत कामाला आहेत. पतीचे निधन झाले असून, त्यांची पिंप्राळा परिसरातील सोनीनगरमधील रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, या प्रेमसंबंधाला रोहनच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता.
दसऱ्याच्या मध्यरात्रीच थरार
विजयादशमीच्या दिवशी संगीता बारेला मेहरुण तलावावर रावणदहन पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेथे रोहन तिला जेवणाला घेऊन जाण्यासाठी गेला. तेथून ते दुचाकीने शहरात आले. संगीताला घरी सोडण्यासाठी रोहन दुचाकीने मध्यरात्री साडेबारा ते पाऊणदरम्यान निघाला असताना, त्यांच्या मागे अनिकेत सपकाळे त्याच्या एका साथीदारासोबत आला. त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत जुने स्थानकासमोर अनिकेतने महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर गोळीबार केला. यात संगीता बारेला हिच्या मांडीत गोळी लागल्याने ती जखमी झाली. तिला प्रियकराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातत दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
चौकट
गुन्हा दाखल
घडल्या प्रकाराची दखल घेत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. निरीक्षक सागर शिंपी व त्यांच्या पथकाने जिल्हा रुग्णालयात दाखल महिलेचा जबाब नोंदविला असून, या प्रकरणी बुधवारी (ता. २१) अनिकेत मधुकर सपकाळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक सावित्री ढगे तपास करीत आहेत.