ॲंकर
(सिग्नलचे एआय फोटो वापरावेत)
---
पंधरा सिग्नलवर अडीच कोटीवर खर्च; तरी निम्म्याहून अधिक बंद
आकाशवाणी चौकातील यंत्रणेवर तब्बल कोटींवर खर्च; महासभेत मागणार हिशोब
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वर्षभरात बसविण्यात आलेल्या १५ ट्रॅफिक सिग्नल यंत्रणांवर तब्बल २ कोटी ६१ लाख ३९ हजार ३०२ रुपये खर्च करण्यात आले. मात्र, यापैकी तब्बल नऊ सिग्नल सध्या बंद असल्याने कोट्यवधींचा खर्च नेमका कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे आकाशवाणी चौकातील एकाच सिग्नलसाठी तब्बल १ कोटी १३ लाख ४९ हजार ४१२ रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील कामकाजाची श्वेतपत्रिका उपलब्ध झाल्यानंतर सिग्नल यंत्रणेवरील खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली असून, ९ ऑक्टोबरच्या महासभेत नियम ४४ अन्वये चर्चेची मागणी केली आहे. दरम्यान, चित्रा चौक, स्टेडियम चौक, कालिंका माता चौक, इच्छादेवी चौक, नेरीनाका, अजिंठा चौक, खोटेनगर, पांडे चौक आणि मानराज पार्क येथील सिग्नल बंद आहेत. कोर्ट चौक व शिव कॉलनीतील सिग्नल मर्यादित वेळेत, तर पुष्पलता बेंडाळे चौकातील सिग्नल अधूनमधून सुरू असतो. त्यामुळे ‘खर्च कोट्यवधींचा आणि सुविधा बंद’ या विरोधाभासावर महासभेत काय चर्चा होते, याकडे लक्ष लागून असणार आहे.
चौकट
सिग्नल बसविण्याचा खर्च अधिक
सिग्नल बसविण्यासाठी महापालिकेने १२ जाहीर निविदा आणि तीन ई-निविदा प्रक्रिया राबविल्या. त्यानुसार पुण्यातील न्यूक्लोनिक्स ट्रॅफिक इक्विपमेंट प्रा. लि.ने आकाशवाणी चौक, खोटेनगर आणि अजिंठा चौकातील सिग्नलची कामे केली. उर्वरित १२ ठिकाणी वरद इलेक्ट्रिकल वर्क्स, जळगाव या संस्थेने काम केले. यामध्ये न्यूक्लोनिक्सच्या सिग्नलसाठी तुलनेने अधिक खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामुळे महासभेत मंजूर निधी, निविदा प्रक्रिया, कामांचे आदेश, ठेकेदारांना अदा केलेली रक्कम आणि सध्या कार्यरत असलेल्या सिग्नलची स्थिती याचा संपूर्ण तपशील सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.