मालवाहू वाहनाला
कारची धडक
जळगाव : समोरून भरधाव येणाऱ्या कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने वाहनचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता. ३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास कानळदा-जळगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ घडला. अपघातानंतर जखमी चालकाला मदत न करताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी गुरुवारी (ता. ६) गुन्हा दाखल झाला आहे. इब्राहीम रहीम पिंजारी (वय ३६, रा. डी. मरियम पार्क, शिवाजीनगर, जळगाव) हे मालवाहू वाहन (एमएच १९ बीएम १९०४) घेऊन कानळदा येथून जळगावकडे येत होते. कानळदापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पेट्रोलपंपाजवळ समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०५ सीए ३१२३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचालक पसार झाला. नागरिकांनी जखमी पिंजारी यांना वाहनातून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमीचे भाऊ सलमान रहीम पिंजारी (वय ३८, रा. मरीयम पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------
मधमाश्यांचा हल्ला;
सहा महिला जखमी
जळगाव : ममुराबाद (ता. जळगाव) येथे मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. ६) ही घटना घडली. मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली. जखमी महिलांना अत्यवस्थ अवस्थेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात सीमा भगवान पाटील (वय ४०), मंगला कोल्हे (वय ४०), लताबाई पाटील (वय ६०), निंबाबाई राघो पाटील (वय ६०), कल्पना विलास पाटील (वय ३८) आणि अनिता चंद्रकांत पाटील (वय ३५, सर्व रा. ममुराबाद) या सहा महिला जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
---------------------