NSK26H33275
जळगाव : महापालिका प्रशासकीय इमारतीत नुकत्याच टाकलेल्या टाइल्स अशा पद्धतीने खचल्या आहेत.
---
महापालिका टॉवरखालीच निकृष्ट कामाचा नमुना
कंत्राटदाराने टाइल्स बसविल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत खचल्या
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : दिव्याखाली अंधार, या म्हणीचा प्रत्यय महापालिकेच्या सतरा मजली इमारतीखाली आला. इमारतीखालून गेलेल्या ड्रेनेज पाइपलाइनवर बसविलेल्या टाइल्स अवघ्या दोन दिवसांत खचल्या. या प्रकारामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महापालिका प्रशासनाच्या देखरेखीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापालिका टॉवरखालीच निकृष्ट कामाचा नमुना पाहायला मिळत आहे. महापालिका इमारतीखाली शिवसेना कार्यालय ते अमर रगडा यांच्यासमोरील परिसरात ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. १० ऑक्टोबरला काम पूर्ण करून कंत्राटदाराने आकर्षक टाइल्स बसविल्या. मात्र, अवघ्या २४ तासांतच या टाइल्स खचून पाइपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात रुतल्या. काम पूर्ण होऊन दहा-बारा दिवस उलटले, तरी महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याच मार्गाने अधिकारी व कर्मचारी ये-जा करतात. या निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, कंत्राटदाराला दिलेला पैसा खड्ड्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे. या कामाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न दुकानदार उपस्थित करीत आहेत.
-------