esakal | Jayant Patil : "भाजपचे राजकारण वाकड्या पद्धतीने"
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil : "भाजपचे राजकारण वाकड्या पद्धतीने"

Jayant Patil : "भाजपचे राजकारण वाकड्या पद्धतीने"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील विचारांचे विष पेरताना दुसरीकडे ‘ईडी’च्या चौकशा लावून मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून रचले जात आहे. त्यासाठी किरीट सोमय्या यांच्यासारखे अनेक जण कार्यरत असून, त्यांच्याकडून बदनामीच्या माध्यमातून मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. वाकड्या पद्धतीने भाजपचे चाललेले राजकारण मोडीत काढण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम करण्याचे आवाहन करतानाच प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी छगन भुजबळ, अनिल देशमुख व एकनाथ खडसे यांच्यामागे पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे स्पष्टीकरण दिले.

परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जलसंपदामंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर खोटे आरोप करून, महाराष्ट्र सदनाच्या निधीत गैरव्यवहार केल्याच्या नावाखाली त्यांचा तुरुंगवास घडवून आणला. मात्र, न्यायालयाने भुजबळ यांची नुकतीच मुक्तता केल्याने, आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट झाले. आता एकनाथ खडसे यांच्या जावयाने नव्हे, तर त्यांच्या मित्राने परदेशात खरेदी केलेल्या एक एकर जमिनीच्या प्रकरणात मनी लॉण्ड्रींगच्या नावाखाली जावयाला अटक करून खडसे यांना त्रास दिला जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा आरोप करणारे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग परदेशात पळून गेले आहेत. पळून जाणाऱ्यांच्या मागणीवर देशमुख यांची चौकशी सुरू आहे. या सर्व घटनांतून काहीही करून मंत्र्यांवर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमागे ‘ईडी’ची चौकशी लावून त्यांना बदनाम करायचे भाजपचे षडयंत्र आहे. त्यासाठी किरीट सोमय्यांसारखे अनेक नेते भाजपने सोडले आहेत. काय घडणार याचा प्लॅन आधीच बाहेर पडतो. डिसेंबरपर्यंत मंत्र्यांना टार्गेट करून सरकार पाडले जाईल.

त्यानंतर परमबीर सिंग पुन्हा मुंबईचे पोलिस आयुक्त होतील किंवा केंद्रात त्यांना मोठ्या हुद्द्यावर बसविले जाणार असल्याचे वक्तव्य भाजपच्या एका नेत्याच्या संभाषणातून बाहेर आल्याने बदनामीसाठी भाजप नेत्यांनी पातळी सोडल्याचे स्पष्ट होते. देशात अनेक संस्थांच्या खासगीकरणातून ६०-७० वर्षांत तयार झालेले ते विकण्याचे काम मोदी सरकार करत आहे. इम्पिरिकल डेटाची मागणी करूनही केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याने ओबीसीविरोधात असल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, ॲड. माणिकराव कोकाटे, नितीन पवार, सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार पंकज भुजबळ, हेमंत टकले, जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे आदी उपस्थित होते.

पवार पॉवर सेंटर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कामाचा आवाका बघून आपल्याला अधिक ऊर्जा मिळते. त्यामुळे शरद पवार आपले पॉवर सेंटर असल्याचे पालकमंत्री भुजबळ म्हणाले. प्रत्येक ठिकाणी आपली ताकद उभी करून त्याद्वारे स्वबळावर निवडून येण्याचे आवाहन त्यांनी केले.

loading image
go to top