esakal | आरती केली मंत्र्यांनी; गुन्‍हा मात्र कार्यकर्त्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

आरती केली मंत्र्यांनी; गुन्‍हा मात्र कार्यकर्त्यांवर

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : राज्‍याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील नवश्‍या गणपती मंदिरात रविवारी (ता. १८) दर्शन घेत आरती केली होती. त्यानंतर सामान्‍यांसाठी असलेले निर्बंध मंत्र्यांना लागू नाहीत का, असा प्रश्‍न उपस्‍थित झाला होता. मंत्री आव्‍हाड यांनी पूजाविधी केला असताना, गुन्‍हा मात्र कार्यकर्त्यांविरोधात दाखल झाला आहे. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या पाच जणांविरोधात गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Jitendra Awhad performed pooja and police case registered against the activists)

कोरोना महामारीत वीक एन्ड लॉकडाउन व अन्‍य निर्बंध लागू आहेत. असे असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी नवश्‍या गणपती मंदिरात रविवारी पूजा व आरती केली होती. या घटनेनंतर मंत्री आव्‍हाड यांच्‍यावर टीकेची झोड उठली होती. या घटनेच्‍या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १९) पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. असे असले तरी मंत्री आव्‍हाड यांच्‍यावर कुठल्‍याही स्‍वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही.

कोरोना प्रादुर्भावामुळे अधिसूचनांकडे दुर्लक्ष करून नवश्‍या गणपती मंदिरात दर्शन व आरती करणाऱ्या पाच भाविकांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. मनाई आदेश असताना, नियमांचे पालन न केल्‍याने हवालदार एस. एन. बच्‍छाव यांच्‍या फिर्यादीवरून हा गुन्‍हा दाखल झाला आहे. योगेश नामदेव दराडे, स्‍वप्‍नील प्रभाकर चिंचोले, (रा. अश्‍विननगर, सिडको), विक्रांत उल्‍लास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळीबा घुगे (रा. मोरवाडी गाव, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. नियमांचे उल्‍लंघन करत देवदर्शन करताना मंत्री जितेंद्र आव्‍हाड पोलिसांच्‍या कारवाईपासूनही बचावले आहेत.

(Jitendra Awhad performed pooja and police case registered against the activists)

हेही वाचा: कोरोनामुळे मुलांनी घरीच केली 'विठ्ठल-रखुमाई' वेषभूषा

loading image