Nashik News: जॉयफुल लर्निंग विथ Zumba Dance! माळीनगर शाळेचा दप्तरमुक्त शनिवारचा उपक्रम ठरतोय लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Bharat Patil taking Zumba dance every Saturday at Malinagar school

Nashik News: जॉयफुल लर्निंग विथ Zumba Dance! माळीनगर शाळेचा दप्तरमुक्त शनिवारचा उपक्रम ठरतोय लक्षवेधी

सोयगाव (जि. नाशिक) : विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावं अन् जीवनाचा खरा आनंद मिळावा यासाठी तालुक्यातील दुंधे गावाची माळीनगर शाळा आपल्या 'जॉयफुल लर्निंग विथ झुंबा' या उपक्रमामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

माळीनगर शाळेचा दप्तरमुक्त शनिवार असला म्हणजे झुंबा डान्स ठरलेलाच असतो. तालबद्ध हालचालीचा प्रकार करताना संगीतासोबत शरीर आपोआप थिरकते. (Joyful Learning with Zumba Dance Malinagar Schools Notebook Free Saturday initiative becoming an eye catcher Nashik)

झुंबा डान्स तसा एरोबिक्स डान्स प्रकार आहे. यात आपल्याला आवडेल ते संगीत लावून वर्कआऊट केला जातो. यात अहिराणी खानदेशी भाषेतील गीतांचा उपयोग करून पाय, गुडघे, कंबर, हात, खांदे, मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम करतात.

मुले संगीतासोबत वर्कआऊट करत असल्याने स्नायू बळकट होण्यास मदत होते. मानसिक स्वास्थ तंदुरूस्त राहते. आपला रक्तदाब सुधारतो. कॕलरीज बर्न करता येतात असे अनेक फायदे झुंबा डान्सने होतात.

झुंबा डान्स दर आठवड्याला वेगवेगळ्या गीतांसोबत होत असून नृत्याबरोबरच हालचाली असल्याने सर्वच विद्यार्थी यात सहभागी होतात. शरीरात नवी ऊर्जा निर्माण होऊन मुलांच्या मनात उत्साह निर्माण होऊन शाळेविषयी आपुलकी गोडी निर्माण होते.

सोशल मिडियावर येथील हा उपक्रम शेअर झाल्याने राज्यातील अनेक शाळांत हा उपक्रम आता राबवला जात आहे. सोशल मिडियात खानदेशी अहिराणी गाण्यावर केलेल्या शालेय झुंबास हजारो व्हिवज् मिळत आहेत. हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी येथील प्रयोगशील शिक्षक भरत पाटील, विद्यार्थी व पालक मेहनत घेत आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

आळस शरीराचा मोठा शत्रू

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः।

नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति।।

हा संस्कृत श्‍लोक. अर्थात, आळस हा शरीराचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. परिश्रमासारखा हा एक चांगला मित्र आहे. त्यातून कुणीही उदासिन राहत नाही.

"शासनाचे अनेक उपक्रम हे माळीनगर शाळेत सातत्याने राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना 'जॉयफुल लर्निंग विथ झुंबा' या उपक्रमातून खानदेशी अहिराणी गाण्यांचा माध्यमातून व्यायामाचे, वार्म अपचे महत्त्व पटवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळत आहे."

- भरत पाटील, प्रयोगशील शिक्षक, माळीनगर.

"आम्ही दप्तरमुक्त शनिवारची खूप आवर्जून वाट पाहतो. शनिवारी खूप मजा येते. झुंबा करून योगासने, प्राणायम, ध्यान करताना मनाला शांतता लाभते. आम्ही सोबतीने पुस्तके वाचतो."

- जयश्री सोनवणे, विद्यार्थिनी, चौथी

टॅग्स :NashikstudentteacherZumba