OBC आरक्षणाची न्यायालयीन अन्‌ राजकीय लढाई सुरू राहणार - छगन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

OBC आरक्षणाची न्यायालयीन अन्‌ राजकीय लढाई सुरू राहणार - छगन भुजबळ

नाशिक : ओबीसींचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकार आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची न्यायालयीन व राजकीय लढाई सुरूच राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते.

इम्पिरिकल डेटा जमा करण्यासाठी समर्पित आयोग

मागील सरकारच्या काळात ओबीसींच्या आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्‍न तयार झाला. न्यायालयाने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागितला असताना मागील सरकारने योग्य वेळी हालचाल केली नाही. निवडणुका तोंडावर आल्यावर इम्पिरिकल डेटा मागण्यास सुरवात झाली. केंद्र सरकारने तो डेटा दिला नाही, असे सांगतानाच श्री. भुजबळ यांनी कोरोनामुळे (Corona) आताच्या सरकारला इम्पिरिकल डेटा जमा करता आला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की आपण न्यायालयीन लढाई सुरू ठेवली होती. न्यायालयाने जानेवारीमध्ये आहे. त्या डेटाचा अंतरिम अहवाल आयोगातर्फे मांडा, असे स्पष्ट केले. त्यासाठी राज्य सरकारने न्या. आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. न्यायालयात डेटाचा अंतरिम अहवाल सादर केला. त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि न्यायालयाने तो अहवाल फेटाळला, पण राज्य सरकार शांत बसले नाही. राज्य सरकारने आता समर्पित आयोग नेमला असून, राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांची नेमणूक केली आहे. त्यात निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे, नरेश गिते, एच. बी. पटेल, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थेचे संचालक आदींची नेमणूक केली. समर्पित आयोग आता इम्पिरिकल डेटा जमा करेल. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनेचा अधिकार राज्याने आपल्याकडे घेतला. त्यामुळे प्रभागरचनेला लागणाऱ्या वेळेत नवीन समर्पित आयोग इम्पिरिकल डाटा जमा करेल आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होईल.

हेही वाचा: OBC विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; कायद्याचा मार्ग मोकळा

माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, बापू भुजबळ, ईश्‍वर बाळबुधे, शिवाजीराव नलावडे, तुकाराम बिडकर, सदानंद मंडलिक, रवींद्र पवार, प्रा. दिवाकर गमे, राजेंद्र महाडोले, रमेश बारस्कर, शालिग्राम मालकर, दिलीप खैरे, ॲड. सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, मकरंद सावे, पार्वती शिरसाट, मंजिरी घाडगे, कविता कर्डक, वैष्णवी सातव, कविता खराडे, कविता मुंगळे, डॉ. डी. एन. महाजन, मोहन शेलार, संतोष डोमे, प्रा. ज्ञानेश्‍वर दराडे, प्रा. नागेश गवळी, समाधान जेजूरकर आदी बैठकीस उपस्थित होते.

महापुरुषांचे विचार पोचवावेत

महापुरुषांबद्दल जाणूनबुजून अफवा पसरविण्यात येत आहेत. जनतेच्या मनात तेढ निर्माण होण्यासाठी ही कृती केली जात आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, आपल्या हातात अजून लेखणी नाही. म्हणून सर्वांनी सत्य जनतेपुढे ठेवावे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबद्दलचे विचार जनतेपर्यंत पोचवावेत, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा: 'OBC आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादीने काहीच प्रयत्न केले नाहीत'