NSK26H31839
जळगाव : महासभेत बोलताना अरविंद देशमुख.
---
‘बायपास’ बंद काळातील
मृत्यूंना न्याय मिळालाच पाहिजे!
उपशीर्षक
महासभेत अरविंद देशमुख यांची आग्रही मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : जळगाव शहराबाहेरून जाणारा पाळधी-तरसोद बायपास रस्ता महिन्याहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. बायपास बंद असताना झालेल्या अपघातांमुळे जे निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय आणि नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी आज जळगाव महापालिकेच्या महासभेत केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील या बायपास रस्त्याच्या बंदीमुळे जळगाव शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि रहदारीच्या ठिकाणी जड वाहनांची वर्दळ वाढली. त्यातून अपघातांची संख्या वाढली आणि या अपघातांमध्ये सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा देशमुख यांनी सभागृहात ठामपणे मांडला. त्यांनी स्पष्ट केले की, रस्ता आज सुरू झाला म्हणून बायपास बंद काळातील मृत्यूंचा प्रश्न संपत नाही. त्या काळातील निष्काळजीपणा, चुकीचे नियोजन आणि नागरिकांच्या जीविताशी झालेला खेळ याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी आक्रमकपणे मांडली.
---------