संशयित पतीला बडतर्फी करण्याची मागणी
दीपाली पवार मृत्युप्रकरण : खासदार भगरे यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : परिचारिका दीपाली पवार मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांना न्याय मिळावा, संशयितांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि दीपालीच्या मुलाचे भवितव्य सुरक्षित व्हावे, यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दिपालीच्या कुटुंबीयांसमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांच्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. संशयित पतीला शासकीय सेवेतून बडतर्फीच्या मागणीसंदर्भात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
दिपाली पवार मृत्यूप्रकरणातील संशयित पती अनिल सोन्याबापू पवार हा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असून, विभागीय चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली. दिपालीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाच्या संगोपनाचा आणि भवितव्याचा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा आहे. मुलाला सुरक्षित कौटुंबिक आधार मिळावा आणि त्याचे संगोपन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी त्याचा कायदेशीर ताबा दिपालीच्या आईकडे देण्याची मागणी केली असता, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, मुलाच्या शिक्षण, संगोपन, आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील गरजांसाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी करण्याबाबतही चर्चा झाली.