Nashik Kala Katta | प्रतिभेतून प्रतिमा साकारणारे युवा शिल्पकार : श्रेयस गर्गे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shreyas Garge

Nashik Kala Katta | प्रतिभेतून प्रतिमा साकारणारे युवा शिल्पकार : श्रेयस गर्गे

"सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या आपल्या नाशिकला समृद्ध आणि परंपरागत शिल्पकलेचाही वारसा लाभलेला आहे. हा वारसा सार्थ करून आपली नवी कलाओळख निर्माण करणारे, आजच्या पिढीचे प्रतिभावान शिल्पकार श्रेयस मदन गर्गे. ‘सकाळ’ च्या वाचकांशी संवाद साधताना ते म्हणतात, शिल्प ही सृष्टीच्या सृजनाची एक सुंदर भाषा आहे. ही भाषा आधी ‘अव्यक्त’ असते, मग ती सूक्ष्मरूपात प्रतिभा बनून दर्शन देते, मग हीच दर्शनातली प्रतिभा स्थूलरूपाने कल्पना बनून मनात साकारते आणि शेवटी मनातले हे सौंदर्य, शिल्प बनून साकार होते, असा हा अव्यक्ताकडून व्यक्त होणारा सर्जनशील प्रवास आहे."- तृप्ती चावरे तिजारे

(Kala Katta Young Sculptors Making Images From Talent Shreyas Garge interview by trupti chaware tijare nashik news)

त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या गर्गे आर्ट स्टुडिओने तीन पिढ्यांच्या साक्षीने शंभर वर्षे पूर्ण केली, परंतु तरीही श्रेयसजी असे मानतात की शिल्पकलेला जन्म देणाऱ्या पहिल्या जनकापासूनच त्यांची परंपरा सुरू होते. त्याच परंपरेचे पाईक, थोर शिल्पकार मदन गर्गे आणि अरुणा गर्गे यांची सौंदर्यदृष्टी बघत बघतच ते मोठे झाले.

घरातील वातावरण आणि शिकण्याचे माध्यम कला हेच होते. त्यामुळे सहाजिकच कला हेच जगण्याचे ध्येय झाले. या ध्येयाचा खरा अर्थ समजून घेण्याच्या वयातच त्यांच्या बाबांचे भक्ती आणि शक्ती या शिल्पाकृतीचे काम एखाद्या तपश्चर्येसारखे सुरू होते.

त्या कामाचे डिटेलिंग इतके सूक्ष्म होते, की श्रेयसजी जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेऊन, पदवी घेऊन बाहेरही पडले, तरीही त्या एकाच शिल्पावरच अहोरात्र काम सुरू होते. असे काय होते त्यात, भक्तीचे शिल्प अंतर्वक्र तर शक्तीचे शिल्प बहिर्वक्र का, थोरामोठ्यांच्या चर्चेतून त्यांना शिल्पविचार समजत गेला की, भक्ती ही आतून बाहेर यावी लागते.

म्हणून तिची दिशा आतून बाहेर जाणारी, तर शक्ती ही बाहेरून आत संचारावी लागते म्हणून तिची दिशा बाहेरून आत येणारी. भक्तीसाठी सात सूर लागतात म्हणून भक्ती शिल्पात सात वारकरी, तर शक्तीसाठी हाताची पाच बोटे एकत्र करून मूठ आवळली जाते म्हणून शक्तीशिल्पासाठी पाच मावळ्यांची योजना.

केवढा हा सखोल विचार, शब्देवीण संवादु साधणारा, केवळ भावमुद्रेकडे पाहून, क्षणार्धात इतिहास जिवंत व्हावा, अशा स्मरणशिल्पांचे असे संस्कार श्रेयसजींवर झाले. त्यामुळे शिल्पकलेचे जणू मर्मच त्यांच्या भाषेतून उलगडते. शिल्पातला खराखुरा अर्थ समजतो, विशेष म्हणजे, हीच भाषा त्यांच्या स्वतःच्या शिल्पाकृतीत उतरलेली आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

कला ही आत शिरली तरच बाहेर पडते, या वाक्याचा खरा अर्थ जाणून श्रेयसजी शिल्पकलेच्या अंतरंगात शिरतात. पंच महातत्त्वांचे त्यांचे शिल्प बघताना याचा प्रत्यय येतो. मुक्तशैलीच्या जवळ जाणाऱ्या या शिल्पात त्यांनी पृथ्वी, आप आणि आकाश ही तीन दृश्य तत्त्वे प्रत्यक्ष साकारली असून वायू आणि तेज या अदृश्य तत्त्वांना मानवी चेहरा दिला आहे.

लोकमान्य टिळकांचे त्यांनी साकारलेले शिल्प पाहून टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातील खऱ्याखुऱ्या आत्मविश्वासाची प्रचिती येते, जणू लोकमान्यांच्या संपूर्ण जीवनाचे सार त्या कलाकृतीत उतरलेले आहे.

ते म्हणतात प्रत्येक शिल्पाचा स्वतःचा असा एक आत्मविश्वास असतो, तो नेमका कुठून प्रकटतो हे समजले पाहिजे. म्हणून, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्ती शिल्पात त्या व्यक्तीचा स्वभाव, तिची वैशिष्ट्ये, वेशभूषा, केशभूषा, संघर्ष आणि जीवनाचा दृष्टिकोन प्रत्ययास येतो.

अहंकारापासून सावध असले पाहिजे

शिल्पकला शिकणाऱ्या नव्या पिढीसाठी ते संदेश देतात की, शिल्प घडवीत असताना समोर स्वतः साकारलेले सौंदर्य प्रत्यक्षात मूर्त रूपाने समोर दिसते. पण त्यातून माझ्या हातून काहीतरी घडते आहे, असा अहंकार येण्याची शक्यता असते. अशाने साधनेवरचे लक्ष विचलित होते. शिल्प साकारणे दूर, परंतु कलाविकासही खुंटतो, म्हणून या अहंकारापासून सावध असले पाहिजे.

प्रत्येक शिल्प तुम्हाला एक नवी ऊर्जा देत असते, त्यातला नवा संदेश मात्र ऐकू आला पाहिजे. शिल्पकलेची श्रेयस गर्गे यांची वर्तुळाकार शैली ही स्थिर शिल्पातल्या गतिमानतेचे साकार रूप आहे. हे रूप घरंदाजपणे जपता जपता त्यांच्या हातातील लय ही शिल्पकलेशी एकरूप झाली आहे. त्यांच्या हातून नाशिकच्या शिल्पकलेचा नवा इतिहास रचला जाईल यात शंका नाही.

टॅग्स :Nashikartsculptor