महिला विशेषसाठी-----
फोटो : NSK26H32334/
नंदुरबार : जिल्हा परिषदेचा ‘उत्कृष्ट उद्योजिका’ पुरस्कार स्वीकारताना कातुताई गावित.
फोटो : NSK26H32335
बोरझर : गावातून होणारे मधाचे उत्पादन.
--------------
बोरझरला ‘मधाचे गाव’ बनविणाऱ्या कातुताई गावित
पारंपरिक पद्धतीत बदल करण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण
विलास पवार : सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : बोरझर गावाच्या जंगल परिसरात मध गोळा करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मात्र, हा व्यवसाय पारंपरिक पध्दतीने केला जात होता. या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास मधाला बाजारपेठ मिळेल आणि महिलांच्या हाताला कामही मिळेल, हा विचार कातुताईंनी त्यांच्या सोनिया महिला बचतगटाच्या महिला सदस्यांपुढे मांडला. यासाठी ‘उमेद’ संस्थेचे मार्गदर्शन घेऊन मध व्यवसायाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला. झाडावर जाळपोळ करून मध संकलित करण्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल होण्यासाठी ३० लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. यामुळे मधाची चव बदलली आहे.
--------
जंगलातून मध संकलन करणाऱ्या नागरीकांकडून खरेदी केल्यानंतर त्यावर नैसर्गिक पध्दतीने प्रक्रीया केली जाते. त्यानंतर लॅब टेस्टींग करून पॅकेजिंग केली जाते. मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित महालक्ष्मी भारत प्रदर्शनात हे मध सर्वप्रथम विक्रीसाठी ठेवण्यात आले. त्याठिकाणी १५ दिवसातच २०० किलो मधाची विक्री झाल्याने बचत गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर एसबीआय फाउंडेशनतर्फे मुंबईत आयोजित ‘घे भरारी...मला पंख मिळाले’ या प्रदर्शनात ५०० किलो मधाची विक्री झाली. यातूनच बोरझर गावाला ‘मधाचे गाव’ करण्याचा संकल्प झाला. कातुताईंच्या संकल्पनेतून ‘ऋत्वीक ऑरगॅनिक प्रॉडक्ट’ या नावाचा ट्रेडमार्क तयार झाला असून, सातपुड्यातील मधाला आता महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. १०० ग्रॅमपासून एक किलोपर्यंत पाच प्रकारचे पॅकेजिंग करून मधविक्री केली जाते. मधाच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी आता ब्लॅक राईस, ब्राऊन राईस, तुरडाळ आणि उडीद डाळ विक्री व्यवसायाची जोड दिली आहे. या माध्यमातून बचतगटातील सुमारे २५ महिलांना रोजगार मिळाला आहे. ‘उमेद’ संस्थेचे संन्यासी संजीवन आणि अरविंद गावित या अधिकाऱ्यांचे त्यांना यासाठी मार्गदर्शन लाभत आहे. आता मधाचा एक स्वतंत्र प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून, ‘मधाचे गाव’ म्हणून बोरझरची ओळख बनली आहे.
कातुताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, त्यांचे माहेर आणि सासर दोन्हीकडील कुटुंब शेती व्यवसाय करणारे आहेत. कातुताईंनी गावाची नवी ओळख निर्माण करताना आज २५ महिलांच्या हाताला काम तर दिलेच. पण, राजकारणातही त्यांनी वाटचाल कौतुकास्पद राहिली आहे. बोरझर गावाच्या सरपंच, पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कातुताईंचे पती गावाचे पोलिस पाटील असून, आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांनी एका मुलीला पोलिस दलात कॉन्स्टेबल, तर दुसऱ्या मुलीला महाराष्ट्र शासनाच्या राज्य सुरक्षा मंडळात सुरक्षा अधिकारी बनविले आहे. इतर महिलांनाही प्रेरणादायी असे त्यांचे कतृत्व राहिल्याने नंदुरबार जिल्हा परिेषदेने त्यांचा ‘उत्कृष्ट उद्योजिका’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच, ‘हिरकणी’ पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत.
-------
मी शेतकरी कुटुंबातून पुढे आली आहे. मधाच्या उद्योगातून बचत गटातील महिलांच्या हाताला रोजगार मिळावा, याचा आनंद आहे. आमचा प्रकल्प उभारून पुर्ण झाल्यानंतर रोजगाराची संख्या वाढणार आहे. स्वत:बरोबरच इतर महिलांचा विकास व्हावा आणि गावाचा नावलौकीक वाढावा, यासाठी आमच्या सोनिया बचत गटाचे काम सुरू आहे. परिश्रम आणि प्रयत्नांमुळे महिलेला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे कठीण नसते.
- कातुताई भिमा गावित, बोरझर (ता. नवापूर)