पोळा झाला तरी खरीप कांदा लागवड संथच! यंदा लागवडीचे नियोजन कोलमडले; वाचा सविस्तर

kharif onion cultivation Planning collapsed nashik marathi news
kharif onion cultivation Planning collapsed nashik marathi news

नाशिक : जिल्ह्यात खरीप लाल पोळ कांदालागवडीची लगबग सुरू आहे. मात्र बियाणे टाकल्यानंतर रोपवाटिका मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन केले होते, तेही पूर्णपणे कोलमडले आहे. जिल्ह्यातील एकूण २० हजार ५८४ हेक्टर क्षेत्रापैकी (ता. १८ अखेर) चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप कांद्याच्या लागवडी पोळा सण होऊनही अजूनही संथ असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दर वर्षी बैलपोळा झाल्यानंतर कांदालागवडीला वेग येतो. तसे नियोजन कांदा उत्पादक करत असतात. मात्र चालू वर्षी तयार केलेली रोपे खराब झाल्याने मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील खरीप कांदालागवडीचे सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र येवला तालुक्यात असून, त्या खालोखाल चांदवड तालुक्यातील क्षेत्र सर्वाधिक आहे. याच तालुक्यामध्ये लागवडी सर्वाधिक झाल्या आहेत. मात्र प्रस्तावित लागवडीच्या तुलनेत झालेल्या लागवडी अजूनही अत्यंत कमी प्रमाणात झाल्या आहेत. 

रोपांची मोठ्या प्रमाणावर मर

जिल्ह्यात जुलैअखेर दोन हजार ७३३ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या. मात्र सततचा पाऊस व दमट हवामानामुळे रोपांची मोठ्या प्रमाणावर मर झाल्याने रोपे खराब झाली. त्यामुळे लागवडी पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत लागवडीचे कसे नियोजन करायचे, या चिंतेत शेतकरी आहेत. नाशिक, दिंडोरी, सुरगाणा व इगतपुरी तालुक्यात कांदालागवडीचे क्षेत्र कमी आहे. मात्र असे असूनही या तालुक्यामध्ये लागवडी सुरू झालेल्या नाहीत. 

शेतकरी कांदारोपांच्या शोधात 

मागील वर्षी कांदा बीजोत्पादन घेताना अतिवृष्टीमुळे डेंगळे खराब झाल्याने बियाणे कमी उपलब्ध झाले. चालू वर्षी रोपे तयार करण्यासाठी ते टाकले. मात्र सततच्या पावसासह हवामानबदल, अपुरा सूर्यप्रकाश यामुळे रोपवाटिका बाधित झाल्या. पुन्हा बियाण्यांची शोधाशोध केली, त्यांचाही तुटवडा अन् दरही कडाडले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडी पूर्ण करण्यासाठी थेट आता कांदारोपांची शोधाशोध सुरू केली आहे. 


आतापर्यंत दोन वेळेस बियाणे टाकले; मात्र ते उतरल्यानंतर मर झाली. त्यामुळे लागवडीचे जे नियोजन होते ते पूर्णपणे बिघडले आहे. खर्च करूनही लागवडी होणार नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे. 
-बाबासाहेब पवार, कांदा उत्पादक, कोळगाव (ता. येवला) 

दर वर्षी जास्त क्षेत्र पोळ कांद्याला ठेवतो. मात्र, या वर्षी लागवडी कमी करूनही रोपे खराब होत असल्याने तेही पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. 
-हरिसिंग ठोके, कांदा उत्पादक, सांगवी (ता. देवळा) 


खरीप कांदालागवडीची स्थिती (हेक्टर) : 
तालुका…..सर्वसाधारण क्षेत्र…...झालेली लागवड 
मालेगाव……...२,४३०...…….....१८० 
सटाणा………..१,२००...………..१४२ 
नांदगाव…………५४०...…….....१६५ 
कळवण………...३७५...………....२९ 
देवळा………....१,५१५...……....८६५ 
दिंडोरी………......१९५...……......० 
सुरगाणा………......१०...……......० 
नाशिक………......१३५...…….....० 

इगतपुरी…………....५६...…….....० 
निफाड…………...४५०...……...१० 
सिन्नर………….....५१८...…....११० 
येवला………......८,३००...…..१,५०० 
चांदवड……….....४,८६०........१,४९९

संपादन- रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com