Kharif Season Preparation : जिल्ह्यात खते अन बियाण्यांचा पुरेसा साठा : कैलास शिरसाठ | Kharif Season Preparation Sufficient stock of fertilizers and seeds in district statement by Kailas Shirsath nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kharif Season Preparation

Kharif Season Preparation : जिल्ह्यात खते अन बियाण्यांचा पुरेसा साठा : कैलास शिरसाठ

Kharif Season Preparation : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात खते व बियाण्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस व शेतात पेरणीयोग्य ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये.

तसेच कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेत्याकडून व पक्क्या बिलातच खरेदी कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे. (Kharif Season Preparation Sufficient stock of fertilizers and seeds in district statement by Kailas Shirsath nashik news)

खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्यासाठी ६.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी युरिया, डीएपी, एमओपी व संयुक्त खतांची २.६० लाख टनाची मागणी नोंदविण्यात आली होती.

यापैकी शासनाकडून २.२३ लाख टन खत्तांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. ९ जूनअखेर जिल्ह्यात युरिया खतांचा ३५ हजार ७९४ टन, डीएपी १७ हजार ७३१ टन, एमओपी एक हजार ६८१, एसएसपी १४ हजार ४७० टन व संयुक्त खते ६८ हजार ४३१ टन असे एकूण १ लाख ३८ हजार १०७ टन खतसाठा उपलब्ध आहे.

जिल्ह्याकरिता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग व उडीद, इत्यादी पिकांचे एकूण ७७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून मागणी प्रमाणे पुरवठा सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठा या दर्जेदार व योग्य दराने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मिळणेकरीता जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकूण १६ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांचे कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ यावर तसेच जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.