Know Your Army : उद्यापासून शहरात ‘नो युवर आर्मी’ प्रदर्शन; 'हे' सैनिकी शस्त्रास्त्र पाहायला मिळणार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian army

Know Your Army : उद्यापासून शहरात ‘नो युवर आर्मी’ प्रदर्शन; 'हे' सैनिकी शस्त्रास्त्र पाहायला मिळणार..

नाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या शस्त्रास्त्रांचे ‘नो (know) युवर आर्मी’ (Know Your Army) दोनदिवसीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.

ईदगाह मैदानावर हे प्रदर्शन होत असून, नाशिककरांसाठी पूर्णतः: खुले राहणार असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल संतोष पांडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Know Your Army exhibition in city from 19 march nashik news)

तोफखाना केंद्राच्या द्रोणाचार्य सभागृहात गुरुवारी (ता.१६) पत्रकार परिषद झाली. त्यात कर्नल पांडा यांच्यासह बॅन्ड पथकाचे प्रमुख कर्नल सुनीलचंद्रन, अश्वदलाचे प्रमुख सुभेदार गौरव मिश्रा, सुभेदार कैलास दळवी उपस्थित होते. तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर ए. रागेश यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शनाचे नियोजन सुरू आहे.

ईदगाह मैदानावर मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे. गुरुवारी दुपारी कमांडंट ब्रिगेडियर ए. रागेश यांनी या ठिकाणी पाहणी केली. कर्नल पांडा म्हणाले, सामान्य नागरिकांना देशाच्या सैन्यदलाचे सामर्थ्य लक्षात यावे आणि शक्तीशाली आधुनिक शस्त्रास्त्रांचे दर्शन घडावे, या उद्देशाने भारतीय संरक्षण खात्याच्या आदेशानुसार तोफखाना केंद्राकडून अशा प्रकारचे पहिले लष्करी शस्त्रास्त्रांचे राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

महाराष्ट्रात प्रथमच अशाप्रकारचे सैनिकी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नागरी वस्तीतील मैदानावर होत आहे. जनतेला तोफखान्याच्या शक्तीशाली आधुनिक तोफांसह रडार सिस्टीम, भूदलाकडे असलेल्या अत्याधुनिक रायफल्स, अश्वारूढ सैनिकांकडून दाखविले जाणारे प्रात्याक्षिकांसह तोफखान्याच्या विशेष बॅन्ड पथकाच्या गीतगायन- वादनाचा अनुभव घेता येणार आहे.

रविवारी (ता. १९) रात्री साडेनऊला प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनात बोफोर्स, आधुनिक धनुष्य, हलकी हॉवित्झर (एम- ७७७), इंडियन फिल्ड सॉल्टम (१५५ एमएम), हलकी तोफ (१०५- एमएम), उखळी तोफ (१३० एम.एम), मोर्टार (१२० एमएम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम-२१), लोरोस रडार सिस्टिमसह अशा तब्बल १९ लहान-मोठ्या तोफा नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Indian Army DayNashik