Know Your Army : भारताची ओळख शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश; नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

know your army nitin gadkari statement about India worldwide as an arms exporting country nashik news

Know Your Army : भारताची ओळख शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश | नितीन गडकरी

नाशिक : २०१४ नंतर मेक इन इंडिया (Make in India) आणि मेड इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भय भारत जगाच्या पटलावर उभा राहिला आहे.

संरक्षण दलातील शस्त्रास्त्रे आणि साधनसामुग्रीची निर्मिती देशातच होऊ लागल्याने लवकर शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख जगभरात होणार आहे. (know your army nitin gadkari statement about India worldwide as an arms exporting country nashik news)

त्यामुळे भारताकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नसून, ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत, भविष्यात डिफेन्स मॅनिफॅक्चरिंग हब म्हणून नाशिकला संधी असून, त्यामुळे युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘नो युवर आर्मी’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) सकाळी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, बंदरे विकास व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, स्कुल ऑफ आर्टीलरीचे लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर ए. रागेश आदींसह आर्टीलरी केंद्राचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

यावेळी श्री. गडकरी म्हणाले, नवतंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याच देशात निर्मिती करण्यात येणारे संरक्षण दलातील साधन सामग्री, सैन्यात दिले जाणारे प्रशिक्षण या माध्यमातूनच देशाचे संरक्षण कसे केले जाते, याची माहिती सर्वसामान्यांना, नवयुवकांना होण्यासाठी या नो युवर आर्मी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनात बोफोर्स तोफ सोबतच भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेली धनुष्य ही तोफदेखील आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठीची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगत, संरक्षण क्षेत्रात तयार करण्यात येणाऱ्या साधन सामग्रीच्या निर्यातीतून देशात नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. नागपूर येथे राफेल एअरक्राप्ट, बोईंग विमानाचे पार्टही बनविण्याचे काम सुरू असल्याने एव्हिगेशनमध्ये नागपूरमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.

प्रारंभी प्रदर्शनाचे उदघाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते फित कापून व हवेत फुगे सोडून करण्यात आले. त्यानंतर, लष्करातील जवानांनी काही प्रात्यक्षिके यावेळी सादर केली. प्रदर्शनासाठी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, आर्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षणार्थी अग्निवीर यांच्यासह राजकीय, सामाजिक व लष्करीतील जवान उपस्थित होते. ले.जनरल एस. हरिमोहन अय्यर यांनी प्रास्ताविक केले तर, खा. हेमंत गोडसे यांनी आभार मानले.

नाशिकला रोजगाराची संधी

नाशिकमध्ये एचएएल कारखाना असून, याठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती करण्याची क्षमता असून, भविष्यात यासाठी डिफेन्स मॅनिफॅक्चरिंग हब होण्याची संधी नाशिकला आहे. यामुळे नाशिकमध्ये रोजगार निर्मितीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असेही श्री गडकरी यांनी सांगितले.

उशिराने आगमन अन्‌ उन्हातान्हात मुली

या प्रदर्शन उद्‌घाटनासाठी शहरातील काही शालेय विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य मंडपाच्या समोरील जागेत शालेय विद्यार्थीनींना बसविण्यात आले होते. केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आगमन तब्बल तासाभराने झाले. तर विद्यार्थी सकाळी साडे-सात आठ वाजेपासून उपस्थित होते. त्यामुळे उन्हा-तान्हात बसलेल्या विद्यार्थिंनी ताटकळल्या.

काही मुलींकडील पाणी संपल्याने त्यांना पाणीही संयोजकांकडून उपलब्ध करून दिले गेले नाही. उन्हाचे चटके जाणवू लागल्याने त्यांच्या शिक्षकांना त्यांना मंडपातील मोकळ्या जागेत बसविण्याचा प्रयत्न केला असता, स्वयंसेवक म्हणून नेमलेल्यांनी त्यांना रोकले. यामुळे शिक्षक व स्वयंसेवक असलेल्यांमध्ये वादावादी झाली.

टॅग्स :NashikArmyexhibition