Ramdas Athawale | लोकसभेला शिर्डीतून लढणार : केंद्रीय राज्यमंत्री आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas athawale statement about lok sabha election nashik news

Ramdas Athawale | लोकसभेला शिर्डीतून लढणार : केंद्रीय राज्यमंत्री आठवले

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) शिर्डी लोकसभा मतदार संघातून आपण स्वत: निवडणूक लढणार आहोत.

त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा भाजपातील पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे. याशिवाय राज्या आणखी दोन जागा आपला पक्ष लढवेल. (Ramdas athawale statement about lok sabha election nashik news)

आपल्या पक्षामुळे भाजपाला देशभरात फायदा झाल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे केंद्रात मंत्रिपद तर राज्यातही विधानसभेसाठीच्या किमान १५ जागा व दोन मंत्रीपदे, एक महामंडळाची मागणी असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली.

गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री. आठवले बोलत होते. ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचीच सत्ता येईल. राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत. विरोधकांतील प्रत्येक पक्षाकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा असल्याचे श्री. आठवले म्हणाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत ५० जागा शिवसेनेला देणार असल्याचे वक्तव्य केल्याने सेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत मंत्री आठवले म्हणाले, ते त्यांचे मत असू शकते. महायुतीत जागा वाटपासंदर्भातील चर्चा होईल. त्यातून शिवसेनेची नाराजी दूर होईल. गरज भासल्यास आपण पुढाकार घेऊ असेही ते म्हणाले

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

आरपीआय (आठवले गट) ताकद देशभरात असून त्याचा फायदा भाजपाला वेळोवेळी झाला आहे. त्यामुळे आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. येत्या लोकसभेमध्ये आपण शिर्डीतून लढणार असून त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा झाली असून,

विधानसभेसाठी किमान १५ तर नाशिक महापालिकेसाठी २२ जागांची मागणी करणार आहोत. लोकसभेसाठी शिर्डीसह मुंबईतून एक आणि आणखी एका जागेची मागणी आहे. आगामी विधानसभेतही किमान पाच-सहा आमदार आपल्या पक्षाचे निवडून येतील असा विश्‍वासही मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.

शिर्डीत २८ मे रोजी अधिवेशन

शिर्डी येथे २८ मे रोजी आरपीआयचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना अधिवेशनाचे निमंत्रण देणार आहे. अधिवेशनात राज्यातील लढायच्या जागा, सर्व जाती-धर्मांमधील व्यक्तींना उमेदवारी देण्यासह विविध विषयांवर मंथन होणार असल्याची माहिती ना. आठवले यांनी दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनास आपला पाठिंबा आहे. यावर सकारात्मक दृष्टिकोनातून राज्यशासनाने निर्णय घ्यावा. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरही शासनाने निर्णय घेतला पाहिजे. आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. तसेच, न्यायालयात सत्तासंघर्षावरून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल आपल्याच बाजुने लागेल असा विश्‍वासही केंद्रीय मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.