पान-३ साठी
--------------
कोटमगाव यात्रेमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
------------
छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कोपरगावमार्गे वैजापूरकडे
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१३ : कोटमगाव येथे नवरात्रोउत्सवामुळे ११ ते २० ऑक्टोबरपर्यंत यात्रा सुरू असून येवल्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या जड अवजड वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ही वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता येवल्याहून कोपरगावमार्गे वैजापूरकडे वळविण्यात आली आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी हा लेखी आदेश काढला आहे.
-------------
कोटमगाव येथे नवरात्रोत्सवात नऊ दिवस राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. शहरातून पहाटेपासून रात्रीपर्यंत भाविक कोटमगाव येथे पायी व मशाल घेऊन जात असल्याने अपघाताची शक्यता वाढते. त्यातच सध्या मालेगाव- येवला -कोपरगाव मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन याचा ताण येवला- संभाजीनगर मार्गावरही पडत असल्याने कोटमगाव यात्रेवर मोठा परिणाम होणार होता.
यामुळे २० ऑक्टोबर रात्री बारापर्यंत येवला ते संभाजीनगर मार्गावर जड व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची प्रत महसूल, गृह, वाहतूक शाखा यांना पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारींनी आदेश काढूनही कोटमगाव येथे जाण्यासाठी भाविकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिस व वाहतूक पोलिसांनी यात लक्ष घालून भाविकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
१६-१ चौकट
संभाजीनगर प्रशासनाचे दुर्लक्ष
येवल्याहून संभाजीनगरकडे जाणारी अवजड वाहतूक कोपरगावमार्गे वैजापूरकडे वळविली असताना दुसरीकडे वैजापूरहून येवल्याकडे येणारे जड व अवजड वाहने संभाजीनगरच्या जिल्हा प्रशासनाने कोपरगावमार्गे येवल्याकडे वळविली नसल्याचे चित्र आहे. यामुळे वैजापूरहून सर्रासपणे येवल्याकडे जड अवजड वाहने येत आहेत. यामुळे कोटमगाव येथे जाणाऱ्या भाविकांच्या जीवाला अपघात होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.