
नाशिक : कुणी कितीही टिंगलटवाळी केली किंवा विरोध दर्शविला, तरी नेहरू-गांधी घराणे आणि काँग्रेसचे योगदान जगाला विसरता येणार नाही. सध्या देशाची अराजकता आणि असहिष्णूतेकडे वाटचाल सुरू असून, खोटा इतिहास सांगितला जात आहे. मात्र, येत्या काळात पुन्हा एकदा खरा इतिहास देशासमोर येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच फक्त आणि फक्त काँग्रेस विचारच या देशाला तारू शकतो, असे विचार मान्यवरांनी गुरुवारी (ता. २२) येथे व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी लिहिलेल्या ‘शोध... नेहरू-गांधी पर्वाचा’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे लोकार्पण महाकवी कालिदास कलामंदिरात झाला. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने विचार मांडले. मनोविकास प्रकाशनचे संस्थापक अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविकात या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका मांडली. लेखक श्री. भटेवरा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांनीही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासाचा पटच प्रेक्षकांपुढे उलगडून दाखविला. देशात नव्याने इतिहास लिहिण्याचे सुरू असलेले काम, हाच खरा चिंतेचा विषय असल्याचेही या वेळी अधोरेखित करण्यात आले.
कोण काय म्हणाले...
उल्हास पवार : देशातील राजकीय, सामाजिक, लोकशाही मूल्ये आणि ऐक्याची भावना टिकावी हा काँग्रेसचा विचार असून, या सर्वांची यथोचित चर्चा या पुस्तकात आहे. आज या देशात पूर्वीसारखी चिंतन शिबिरे होत नाहीत. त्याऐवजी आजकाल होणारी शिबिरे म्हणजे ‘कार्यक्रम’ करण्याचे कार्यक्रम असतात. नेहरू घराण्याचे महाराष्ट्राशीही दृढ नाते आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी जगभर पेरलेला लोकशाहीचा विचार पंतप्रधान मोदींचा पिच्छा सोडणार नाही. काँग्रेसच्या विचारांचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीतील विविध उदाहरणेही या वेळी दिली.
कुमार केतकर : भारताला कॉँग्रेसमुक्त करता-करता भाजपच आता कॉँग्रेसयुक्त होत आहे. याशिवाय जे नेते काँग्रेस सोडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढतात, ते त्यांच्या पक्षाच्या नावात काँग्रेस हा शब्द अवश्य वापरतात. याची अनेक उदाहरणं आहेत. एवढी ही संस्कृती, हा संस्कार भारतीय लोकशाहीत घट्ट रोवला गेलेला आहे. राहुल गांधी यांची ‘भारत यात्रा’ ही याच विचारांची प्रतीक आहे. म्हणूनच ज्यांनी काँग्रेसला कायमच विरोध केला, अशा विविध सिव्हिल सोसायटीचे तब्बल १५० प्रतिनिधी या यात्रेत सहभागी झाले आहेत. हेच या यात्रेचे यश आहे.bस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना विधिमंडळात सत्तारूढ बाकावरून एकाही नेत्याला भाषण करता आले नाही. कारण पंतप्रधान मोदींसह कुणालाही या देशाचा इतिहासच माहीत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्याही आधी महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, कमला नेहरू यांनी ज्या काळात हा देश घडविला, खरी लोकशाही या देशात आणली, त्या वेळेच्या परिस्थितीची कुणीही चर्चा करत नाही. मात्र, हा खरा इतिहास एक दिवस पुन्हा जगासमोर येईल.
छगन भुजबळ : या देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मोतीलाल नेहरू व कमला नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत पाच पिढ्यांचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. देशाच्या फाळणीसाठी पंडित नेहरूंना दोष देण्यापूर्वी त्या वेळची परिस्थिती, वैचारिक संघर्ष, मातब्बरांच्या भूमिका आणि त्यांची दूरदृष्टी यांसारख्या बाबींकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर हा विचार सर्वांपर्यंत पोचावा, यासाठी हे पुस्तक हिंदी व इंग्रजीतूनही भाषांतरित व्हायला पाहिजे.
कुमार केतकर : भारताला कॉँग्रेसमुक्त करता-करता भाजपच आता कॉँग्रेसयुक्त होत आहे. याशिवाय जे नेते काँग्रेस सोडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढतात, ते त्यांच्या पक्षाच्या नावात काँग्रेस हा शब्द अवश्य वापरतात. याची अनेक उदाहरणं आहेत. एवढी ही संस्कृती, हा संस्कार भारतीय लोकशाहीत घट्ट रोवला गेलेला आहे. राहुल गांधी यांची ‘भारत यात्रा’ ही याच विचारांची प्रतीक आहे. म्हणूनच ज्यांनी काँग्रेसला कायमच विरोध केला, अशा विविध सिव्हिल सोसायटीचे तब्बल १५० प्रतिनिधी या यात्रेत सहभागी झाले आहेत. हेच या यात्रेचे यश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.