पान ३, मेन---------- विशेष डिझाइन करणे
----------------------
कुंभमेळ्यातील अतिगर्दी, चेंगराचेंगरीला आळा
----------
पोलिसांचा विशेष सूक्ष्म आराखडा : सीसीटीव्ही, एआय अन् ड्रोनद्वारे असेल थेट निगराणी
-----------
नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान कोट्यवधी भाविकांची सुरक्षा आणि संभाव्य अपघात, तसेच चेंगराचेंगरीसारख्या आपत्कालीन घटना रोखण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाने सूक्ष्म नियोजन करताना व्यापक उपाययोजना केल्या आहेत. व्ही. रमणी आयोगाच्या शिफारशी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (एनडीएमए) मार्गदर्शक तत्त्वे आणि अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा मेळ घालून पोलिस आयुक्तालयाने विशेष गर्दी व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. यामुळे गर्दी अन् चेंगराचेंगरीसारख्या घटनांना रोखता येणे शक्य होईल. २००३ मध्ये कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी शाही मार्गावरील काळाराम मंदिर ते सरदार चौक या दरम्यान २७ ऑगस्ट २००३ ला चेंगराचेंगरी झाली होती. यात २९ भाविकांचा मृत्यू झाला, यात २६ महिला व तीन पुरुषांचा समावेश होता. अरुंद रस्ता आणि एकाच वेळी झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे ही दुर्घटना घडली होती. गर्दीच्या दबावामुळे आणि काही ठिकाणी पायऱ्यांवरून लोक एकमेकांवर कोसळल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या घटनेच्या अभ्यासावरून अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.
....
२०-२
गर्दीची घनता अन् धोक्याची सूचना
- कुंभमेळा काळात गर्दी नियंत्रणासाठी प्रति चौरस मीटर भाविकांच्या संख्येनुसार धोक्याची पातळी निश्चित करण्यात आली आहे.
- सुरक्षित पातळी (२ व्यक्ती/ चौ. मी.) : भाविकांची हालचाल सुलभ व सुरक्षित राहील.
- नियंत्रित पातळी (३ व्यक्ती/ चौ. मी.) : गर्दी जास्त असली, तरी प्रवाहाचा ‘उलटा मार्ग’ नसणे बंधनकारक आहे.
- असुरक्षित पातळी (४ व्यक्ती/ चौ. मी.) : भाविकांचे स्वतःवरील नियंत्रण सुटून अनैच्छिक ढकलाढकली सुरू होते.
- धोकादायक पातळी (५ किंवा अधिक व्यक्ती/ चौ. मी.) : ही अत्यंत धोकादायक स्थिती असून, आतापर्यंतच्या बहुतेक प्राणघातक चेंगराचेंगरीच्या घटना याच स्तरावर झाल्याचे निरीक्षणात आले आहे.
----------------
२०-२
व्ही. रमणी आयोगाच्या पाच प्रमुख शिफारशी
१. एकमार्गी पादचारी मार्ग : गर्दीच्या ठिकाणी ‘उलटा प्रवाह’ हा सर्वांत घातक ठरत असल्याने कडक एकमार्गी पादचारी मार्ग अमलात आणले जातील.
२. प्रवेशापूर्वीच नियंत्रण : गर्दी मुख्य ठिकाणी किंवा अरुंद रस्त्यावर पोहोचण्यापूर्वीच बाहेरून नियंत्रित केली जाईल.
३. वेळेचे विभाजन : आखाडे, स्थानिक भाविक आणि बाहेरून येणारे नागरिक यांच्या वेळेत सुस्पष्ट विभाजन राहील, जेणेकरून गर्दी एकमेकांत मिसळणार नाही.
४. स्पष्ट कमांड व उत्तरदायित्व : ऐनवेळी त्वरित निर्णय घेण्यासाठी घटनास्थळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण राहील.
५. वाहने व मिरवणुकांवर बंदी : अतिगर्दीच्या पादचारी मार्गांवर वाहने, मिरवणुका किंवा इतर कोणत्याही अडथळ्यांना पूर्णपणे बंदी असेल.
------------------
१६-१
सुरक्षिततेचे त्रिस्तरीय नियोजन
१. पूर्वनियोजन व क्राउड मॅपिंग : घाटांची क्षमता निश्चित करून प्रवेश व निर्गमनाचे वन-वे रूट तयार करण्यात आले आहेत. अरुंद रस्ते, पूल व वळणांवर ‘बॉटलनेक’ नोंदवून योग्य अंतरावर बॅरिकेडिंग केले जाईल.
२. मानवी साखळी अन् विशेष पथके : महिला, बालके व वृद्धांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित पोलिसांची ‘मानवी साखळी’ तयार केली जाईल. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी मेडिकल पॉइंट्स, रुग्णवाहिका आणि होमगार्डस/स्वयंसेवक तैनात राहतील.
३. ड्रोन अन् ‘एआय’द्वारे नजर : सीसीटीव्ही व ड्रोनच्या सहाय्याने गर्दीच्या घनतेचे ‘लाइव्ह मॉनिटरिंग’ केले जाईल. गर्दीची घनता अचानक वाढल्यास ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे त्वरित धोक्याचा इशारा मिळेल. तसेच, अफवा रोखण्यासाठी ध्वनिवर्धकावरून सातत्याने अधिकृत सूचना दिल्या जातील.
.......
कोट (फोटो वापरावा)
सिंहस्थ काळात अत्याधुनिक ‘एआय’ बेस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामुळे गर्दीची आगाऊ सूचना पोलिस नियंत्रण कक्षाला मिळेल. परिणामी, मागून येणारा गर्दीचा लोंढा राखून गर्दी नियंत्रणात आणता येणार आहे. गोदाघाट, घाट मार्ग, शाही मार्ग या सर्व ठिकाणी या आधारे निगराणी ठेवता येईल.
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक