फोटो : 37761
त्र्यंबकेश्वर : शहरातील कुंभमेळा कामांची गुरूवारी पाहणी करताना पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मुख्याधिकारी गोविंद जाधव.
दर्शनपथ, गोदावरी नदी कुशावर्त तीर्थाची कामे वेळेत करा
पालकमंत्री महाजन : विकासकामांची पाहणी; भाविकांच्या सुरक्षितता व सुविधांना प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिर परिसरातील विकासासाठी दर्शन पथ, गोदावरी नदी, कुशावर्त तीर्थ तसेच तालुका मध्यवर्ती इमारतीची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
सिंहस्थ- महाकुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा व सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी (ता.८) त्र्यंबकेश्वर येथील विकासकामांचा आढावा घेतला.
संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता, वाहतूक, स्वच्छता आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कोणत्याही परिस्थितीत भाविकांना अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी दिले.
कुशावर्त तीर्थ येथे मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत असल्याने गर्दीचे प्रभावी नियोजन करावे. त्र्यंबकेश्वर परिसरात दर्शनपथ, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अतिक्रमणे हटविणे, नाले बांधणे, विद्युत व्यवस्था, घाटांची उभारणी, फरशी बदलणे तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या सर्व कामांना गती देतानाच कामांचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्याच्या सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या.
प्रारंभी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती इमारतीच्या कामाची पाहणी केली. मध्यवर्ती इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करताना बांधकामाची गुणवत्ता व दर्जा यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, ‘एमएसआयडीसी’च्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह मंदिर संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
स्वच्छतेला प्राधान्य
त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची मोठी वर्दळ लक्षात घेता शहराची नियमित स्वच्छता कायम ठेवावी. दर्शन पथ, मंदिर परिसर, गोदावरी नदी, कुशावर्त तसेच प्रमुख रस्ते आणि घाट परिसरात स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना पुरेशा प्रमाणात उपलब्ध असाव्या. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच नगर प्रदक्षिणावेळीचे गर्दीचे नियोजन काटेकोरपणे करावे, असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी दिले.