वेशीवर बांधले मायबोलीचे तोरण, जुगाराने केले मराठीचे मरण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kusumagraj marathi bhasha gaurav din effect of Gambling in Marathi language nashik

वेशीवर बांधले मायबोलीचे तोरण, जुगाराने केले मराठीचे मरण!

नाशिक : महाराष्ट्राच्या विस्तीर्ण पठाराला व सह्याद्रीच्या घाटमाथ्याला शब्दफुलांचा जलाभिषेक करून, मराठी साहित्याच्या परिप्रेक्ष्य बागा फुलविणारे थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात, कुसुमाग्रज यांचा रविवारी (ता.२७) जन्मदिन! मराठी भाषेचा दर्जा, प्रतिष्ठा व अभिवृद्धीसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या तात्यासाहेबांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून आपण साजरा करत असलो, तरी कुसुमाग्रजांची जन्मभूमी असलेल्या शिरवाडे वणी या गावाच्या वेशीवरच त्यांच्या साहित्यिक व भाषिक महत्कार्याचा उपहास झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मराठी बोलीत ‘म’ मराठीचा असा प्रागतिक विचार पेरणाऱ्या शिरवाडे वणीच्या प्रवेशद्वाराजवळच ‘म’ मटक्याचा का, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे तात्यासाहेब मूळचे शिरवाडे वणी (जि. नाशिक) येथील. साहजिकच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील आणि एकूणच प्रतिष्ठेमुळे प्रत्येकाला आपण नाशिककर असल्याचा अभिमानच आहे. तात्यासाहेबांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करते. २७ फेब्रुवारीला शाळा- महाविद्यालयांबरोबरच शासकीय कार्यालयांमध्येही नियमित हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होतो. एकीकडे हे होत असताना मात्र तात्यासाहेबांच्या जन्मभूमीच्या प्रवेशद्वाराशेजारीच मटका जोरात सुरू आहे. त्यासाठी कुणाचे पाठबळ आहे, हे सांगणे नव्हे. महामार्गालगत मांडलेल्या जुगाराने शिरवाडे वणीकरांची आणि तमाम मराठीजणांची मान शरमेने खाली जावी, असे चित्र पाहून संताप होणार नाही, तरच नवल!

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह

शासकीय कार्यक्रम नाशिकला होत असले, तरी तात्यासाहेबांच्या जन्मभूमीतही शासकीय कार्यक्रम साजरा व्हावा, अशी अनेकांची खंत आहे. हे कार्यक्रम तर दूरच; पण पिंपळगाव पोलिसांच्या आशीर्वादाने गावाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचविण्याचे काम मात्र बिनदिक्कतपणे केले जात आहे, असेच म्हणावे लागेल.

गावाची इभ्रत वेशीला!

शिरवाडे वणी गाव खरंतर काळ्या मातीची सेवा करणारे... प्रत्येकजण मराठी भाषा दिनाच्या सोहळ्यात हिरीरीने सहभाग घेत असतो. यात्रोत्सव असो की कुठलाही जयंती उत्सव, प्रत्येक व्यक्ती या कार्यात झोकून देतो. आजही प्रथमच तात्यासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त ग्रामस्थांनी नवोदितांचे कविसंमेलन भरवले आहे. असे असताना बिनबोभाट सुरू असलेल्या या जुगारअड्ड्यामुळे गावाची इभ्रतच वेशीवर टांगली जाणार आहे.