रब्बी हंगामामुळे मजुरांना अच्छे दिन! शेतकऱ्यांची मात्र दमछाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rabbi Season

रब्बी हंगामामुळे मजुरांना अच्छे दिन! शेतकऱ्यांची मात्र दमछाक

मालेगाव (जि. नाशिक) : सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यासह कसमादेत रब्बी हंगामाची (Rabbi season) धूम आहे. त्यातच उन्हाळी कांदा (onion) लागवड सुरु झाली आहे. शेती कामांना वेग आल्यामुळे सर्वत्र मजुर टंचाई (Labor shortage) जाणवत आहे. काही गावांमध्ये जादा मजुरी देऊन मजुरांची पळवापळवी होत आहे. तालुक्यातील सौंदाणे ग्रामपंचायतीने फलकावर मजुरीचे दर लिहून मजुरांची पळवापळवी करु नये, असे आवाहनच गाव व परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे. वाढत्या शेती कामांमुळे मजुरांना मुबलक काम असून, मजुरीच्या दरातही वाढ झाल्याने काही काळासाठी का होईना मजुरांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

मजुर टंचाईचा विषय ऐरणीवर

कसमादे परिसरात गेल्यावर्षी सर्वत्र सरासरीच्या दीडशे ते दोनशे टक्के पाऊस झाला आहे. तलाव, पाझर तलाव, शेततळे, विहिरी व धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे सलग दुसऱ्या वर्षी रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेती कामांची धुम सुरु असल्याने मजुर टंचाईचा विषय ऐरणीवर आला आहे. मजुरांना ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी लागत आहे. ॲपेरिक्षा, ट्रॅक्टर, पीकअप व चारचाकी वाहनातून मजुरांची ने-आण केली जाते. आठवड्याला बाजाराच्या दिवशी रोजंदारी दिली जाते. काही ठिकाणी तर रोजच्या रोज मजुरांना रोजंदारी देण्यात येत आहे. मजूर मिळत नसल्याने काही ठिकाणी दर वाढवून मजुरांची पळवापळवी केली जात आहे. बाहेरगावी जास्त मजुरी मिळत असल्याने मजुरांचा कलही अन्य ठिकाणच्या कामाकडे दिसून येत आहे. लखमापूर ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन मजुरांना आधी गावातील कामे करण्याचा आग्रह धरणार आहे. मजूर टंचाईमुळे मजुर ठेकेदारांचा भावदेखील वधारला आहे. कसमादेतील सर्वच प्रमुख धरणांमध्ये मुबलक जलसाठा आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात फळशेती देखील वाढणार असून, किमान एप्रिल अखेरपर्यंत मजुरांना मुबलक काम मिळू शकेल.

मजुरीच्या दरात वाढ

कांदा लागवडीसाठी मजुरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शेतकऱ्यांनी एकाच वेळेस रोपे टाकली. रोपे एकाच वेळी तयार झाल्याने लागवडीसाठी लगबग सुरु आहे. महिला मजुरांना पुर्वी दीडशे ते दोनशे रुपये रोज दिला जायचा. आता तो अडीचशे रुपये झाला आहे. पुरुषांना दोनशे ते अडीचशे रुपये रोज मिळायचा. सध्या तीनशेपेक्षा अधिक मिळत आहे. कांद लागवडीचे काम रोजंदारीवर करण्यास कोणीही धजावत नाही. मक्ता पद्धतीने लागवडीसाठी मजुर इच्छूक आहेत. एक एकर कांदा लागवडीसाठी ७ ते ९ हजार रुपये मजुरी घेतली जाते. मक्त्यावर काम घेतल्यास मजुराला दिवसाकाठी पाचशे रुपयांपेक्षा अधिक मोबदला मिळतो.

सध्या सुरु असलेली शेती कामे

गहू, हरभरा लागवड, उन्हाळी व रांगडा कांदा लागवड, मका काढणी, पावसाळी लाल कांदा काढणी, शेवगा काढणी, डाळींब छाटणी, भाजीपाला काढणी.

टॅग्स :NashikAgriculture News