Nashik News : अपुऱ्या व्यवस्था अभावी महिला वर्गाची कुंचबणा; देवळ्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Condition of toilets in city bus stand premises.

Nashik News : अपुऱ्या व्यवस्था अभावी महिला वर्गाची कुंचबणा; देवळ्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव

देवळा (जि. नाशिक) : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांची निवड नुकतीच पार पडली. आतापर्यंत नगराध्यक्षपद महिलांच्याच हाती राहूनही शहरातील महिलांशी संबंधित काही प्रश्न अधांतरीच राहत आहेत.

नुकताच महिला मुक्ती दिन उत्साहात साजरा झाला असला तरी देवळा शहरात महिलांसाठी सुलभ शौचालय व स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेला व नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेला शहरातील स्वच्छतागृहांचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा अशी मागणी प्राधान्याने केली जात आहे. (Lack of adequate system for women Lack of public toilets in deola Nashik News)

सात वर्षांपूर्वी देवळा ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. त्यानंतर नगरपंचायतने स्वच्छ व सुंदर देवळा हा संकल्प समोर ठेवत शहरात अद्ययावत अभ्यासिका, शिवस्मारक उभारणी, पेव्हर ब्लॉक, रस्ते काँक्रिटीकरण, कचरा संकलन केंद्र, भुयारी गटारे, भूमीगत वीजवाहिन्या, चौक सुशोभीकरण, बगीचा आदी विविध विकासकामे पूर्ण केली.

आता नगरपंचायतीची दुसरी टर्म असून काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामुळे शहराचे रूप पालटून गेले असून देवळा आदर्श शहर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परंतु देवळा शहरातील सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावण्यात नगर पंचायतीला मात्र या सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे ही कामे प्रलंबित आहे. ग्रामपालिकेच्या कार्यकाळापासून शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारलेले नाही. यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय होते.

देवळा बसस्थानकात यापूर्वी परिवहन विभागाचे एकमेव स्वच्छतागृह होते, परंतु दोन-अडीच वर्षांपूर्वी बसस्थानकावरील जुनी इमारत व स्वच्छतागृह पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

यामुळे बसस्थानकावर देखील गैरसोय आहे. गावात एक -दोन ठिकाणी ठिकाणी असलेल्या शौचालये देखील पाडण्यात आल्यामुळे पेठ गल्लीतील व्यापारी व नागरिकांचीही गैरसोय होत आहे.

सद्या जुन्या तहसिल कार्यालयाच्या आवारात एक स्वच्छतागृह आहे. त्याचा वापर शहरातील नागरीक, व्यापारी, बाहेरगावाहून आलेले करतात. परंतु दूर अंतरावर असलेल्यांना येथे येणे अवघड होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: SAKAL Impact News : अन् पादचारी पूल नागरिकांसाठी झाला खुला!; नागरिकांनी मानले आभार

आजारांना निमंत्रण

शहरात सार्वजनिक स्वच्छता गृहे नसल्याने नागरिकांची खासकरून महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात कुंचबणा होत आहे. यामुळे आपोआपच आरोग्याशी खेळ होऊन आजारांना निमंत्रण मिळत आहे. यामुळे अनेकांना किडनीचे विकार जडत चालेले आहे.

त्यामुळे देवळा शहरातील तीन ते चार ठिकाणी अद्यावत स्वरूपात महिला आणि पुरुष अशा दोन्ही वर्गांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी व्हावी आणि देवळा बसस्थानकावर देखील स्वच्छतागृहाचे काम प्राधान्याने आधी पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: Nashik News : खानगावनजिक बनले मिरचीचे Hub! अडीच वर्षात 30 कोटी 15 लाखांची उलाढाल

कामे रखडलेलीच

शहरात मारूतीमंदीर, शारदा देवी विद्यालय, नगरपंचायत इमारतीमागे, बसस्थानक परिसर, व कोलती नदीपात्रातील आठवडे बाजार परीसरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचे प्रस्ताव नगरपंचायतीने तयार केले आहेत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष कामांना सुरुवात होत नसल्याने हा प्रश्न जैसे थे पडून आहे.

"तालुक्यातील बचत गटांच्या महिला तसेच आशासेविका व इतरही महिला कायमच देवळा शहरात येत असतात परंतु योग्य असे स्वच्छतागृह नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे." - वैशाली शेवाळे, प्रतिनिधी महिला आयोग

"देवळा शहरात स्वच्छतागृह उभे करण्यासाठी नगरपंचायतीने यापूर्वीच नियोजन केले असून लवकरच त्यांच्या बांधकामाला सुरवात होणार आहे. काही ठिकाणी जागेचा प्रश्न तर काही ठिकाणी इतर काही अडचणी असल्या तरी त्यावर पर्याय शोधत प्राधान्याने हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल." - सुलभा आहेर, नगराध्यक्षा, देवळा नगरपंचायत

हेही वाचा: Jindal Fire Accident : जिंदालमधील आग 60 तासांनंतर आटोक्यात; मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू

टॅग्स :NashikBus Standtoilets