Latest Marathi News | महिलांनो दागिने सांभाळा; सोनसाखळी चोरट्यांकडून धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain Snatching Crime

महिलांनो दागिने सांभाळा; सोनसाखळी चोरट्यांकडून धोका

नाशिक : नवरात्रोत्सवापूर्वीच गेल्या आठवड्यात एकाच दिवशी सोनसाखळी ओरबाडण्याच्या दोन घटना घडल्याने शहर पोलिस सतर्क झाले आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त देवी मंदिरांमध्ये पायी जाणाऱ्या महिला भाविकांची संख्या अधिक असल्याने या संधीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरटे महिलांचे दागिने खेचून नेण्याचे प्रकार घडतात. यासंदर्भात शहर पोलिसांनी महिलांना सावधगिरीचा इशारा देताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मौल्यवान दागदागिने गर्दीच्या ठिकाणी परिधान न करण्याचेही आवाहन केले आहे. (Ladies take care of your jewelry City police appeal to women Nashik Crime Latest Marathi News)

नवरात्रोत्सवात महिला, युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. ठिकठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. तसेच, शहराची कुलदैवत कालिका देवी यात्रोत्सवही असतो. त्यामुळे महिला देवीच्या दर्शनासह यात्रोत्सवात सहभागी होतात, तर गरबा-दांडिया खेळण्यासाठीही महिला-युवती मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. परंतु, याच काळात महिला मौल्यवान दागिने परिधान करून गर्दीच्या ठिकाणी जातात.

त्यामुळे सोनसाखळी चोरट्यांकडून मौल्यवान दागिने ओरबाडून नेण्याच्या घटना नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वी नवरात्रोत्सव काळात एकाच दिवशी पाच सोनसाखळी ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मौल्यवान दागिने परिधान करणे टाळावे असे आवाहन पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी केले आहे.

तसेच, या काळात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. विशेष महिला पथकही तैनात केले जाणार आहे. महिला सुरक्षा शाखेकडून विशेष फिरते पथके नेमण्यात आले आहे. कालिका देवी यात्रोत्सवादरम्यानही मुंबई नाका पोलिसांकडून विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Crime Update : Product Adचे आमिष दाखवून महिलेची 5 लाखांची फसवणूक

गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळावा

घराबाहेर पडताना वा गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने परिधान करून जाणे महिलांनी शक्यतो टाळावे. महिला, युवती नवरात्रोत्सवात दांडिया, गरबा खेळण्यासाठी वा पाहण्यासाठी जातात. अशावेळी गळ्याभोवती स्कार्प गुंडाळावा. जेणेकरून चोरट्याला गळ्यातील सोन्याचे दागिने खेचता येत नाही वा त्यांना दिसत नाही. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांच्या गळ्यातील वा कानातील दागिने चोरणारी टोळी सक्रिय असते. अशावेळी लहान मुलांनाही दागदागिने परिधान करू नयेत. गर्दीच्या ठिकाणी वावरताना सतर्कता बाळगावी. अनोळखी व्यक्तीपासून अंतर राखावे.

"महिलांनी घराबाहेर पडताना वा गर्दीच्या ठिकाणी जाताना मौल्यवान वस्तू वा दागदागिने परिधान करणे टाळावे. जेणेकरून सोनसाखळी चोरट्यांना संधी मिळू शकेल. अथवा परिधान करताना काळजी घेतली, सतर्कता बाळगावी जेणेकरून चोरट्यांना संधी मिळणार नाही."

- संजय बारकुंड, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

हेही वाचा: कुटुंबीयांच्या पाठबळावर सुवर्णा चव्‍हाणके यांची Cancerवर मात