NSK26H31373 : ललित झवर
---------
बहिणीला आणायला निघालेल्या
भावाचा अपघातात मृत्यू
पाळधी-तरसोद ‘बायपास’वर कंटेनरची दुचाकीला धडक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी माहेरी येणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी जळगावला येत असलेल्या ललित मनोहर झंवर (वय ३०, रा. पाळधी, ता. धरणगाव, हल्ली रा. प्रेमनगर, जळगाव) यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या अपघातात ललित पुलावरून खाली फेकले गेल्याने जागीच ठार झाले. पाळधी-तरसोद बायपासवरील टाकळी फाट्यानजीक रविवारी (ता. ४) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
पिंप्राळा परिसरातील ललित झंवर यांच्या आजोबांचे सोमवारी (ता. ५) वर्षश्राद्ध असल्याने कुटुंबीय पाळधी येथे गेले होते. ललित बहिणीला घेण्यासाठी ते दुचाकीने जळगाव रेल्वेस्थानकाकडे निघाले. पाळधीहून बायपासमार्गे येत असताना, टाकळी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे ललित पुलावरून फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थ व वाहनधारकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच झंवर यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालयात धाव घेतली. एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.