Nashik News : लासलगाव विंचूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा; अनेकांनी गमविला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Accident news

Nashik News : लासलगाव विंचूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा; अनेकांनी गमविला जीव

लासलगाव (जि. नाशिक) : विंचूर-लासलगाव रस्त्यावर वाढलेली वाहनांची वर्दळ नागरिकांच्या जिवावर उठली असून आता हा रस्ता अपघाताचे नवे केंद्र बनला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर झालेल्या दोन वर्षात ५० हून अधिक अपघात झाले असून यात सुमारे तीस नागरिकांचा जीव गेला असून अनेकांना अपंगत्व आले आहे. मात्र इतके सारे घडूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने लासलगावकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे. (Lasalgaon Vinchoor road become death trap Many lost their lives Nashik News)

लासलगाव- विंचूर या दोन्ही गावांना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार आहे. दोन्ही गाव परिसरातील खेड्यांची बाजार पेठ आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. लासलगाव मध्ये वाढलेली रहदारी व नित्य होणारे अपघात लक्षात घेता लासलगाव विंचूर रस्ता चौपदरी करणे, लासलगाव कोटमगाव रस्ता चौपदरी करणे तसेच लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम करणे अशी मागणी लासलगाव, विंचूर व परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत.

याच रस्त्यावर २५ डिसेंबर २०२२ रोजी अपघात होऊन दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला तर २६ डिसेंबर रोजी सकाळी फिरण्यास गेलेल्या चार ते पाच महिलांना भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यामुळे तत्काळ या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Dhule News : वैयक्तिक शौचालयांसाठी महापालिकेकडे 4 कोटी पडून

अवघा अर्धा किलोमीटरचा रस्ता बाकी

बाह्य वळण रस्त्याची मागणी तर सन १९९४ पासूनची आहे. यातील लासलगाव विंचूर रस्ता व लासलगाव कोटमगाव रस्ता चौपदरी करण या कामांकडे प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष केले गेले. फक्त लासलगाव बाह्य वळण रस्ता व उड्डाणपुलास सन २००८ मध्ये मंजुरी मिळाली. व प्रत्यक्ष कामास सुरवात देखील झाली. उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र १४ वर्षे उलटूनही बाह्य वळण रस्त्याचे काम अपूर्णच आहे.

साधारणतः साडेतीन किलोमीटरचे अंतर असलेल्या बाह्य वळण रस्त्याच्या कामापैकी अडीच ते तीन किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे.फक्त अर्धा ते पाऊण किलोमीटर बाकी राहिलेल्या कामामुळे बाह्य वळण रस्ता खोळंबलेला आहे. रस्ताबाबत जाब विचारला असता विभागाने निधीचे कारण, लोकप्रतिनिधी अधिवेशनात प्रस्ताव असल्याचे सांगत वेळकाढूपणा करत आहे.

"बाह्य वळण रस्त्यामुळे लासलगावची रहदारीचा समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होईल. मात्र किरकोळ बाकी राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे लासलगाव बाह्य वळण रस्ता व उड्डाणपूल हा संपूर्ण प्रकल्पच रखडला आहे."

-शिवा सुरासे, माजी सभापती, निफाड पं.सं

"लासलगाव विंचूर राज्यमार्ग क्रमांक सात यावरील पाच किलोमीटर अंतर जाण्यासाठी परिसरातील लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दोन वर्षात यर रस्त्यावर ५० हून अधिक लहान-मोठे अपघात होऊन लोकांना आपला जीव गमवाव लागला आहे."

- महेंद्र हांडगे, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव

हेही वाचा: Labor Federation Elections : कौटुंबिक संघर्षात वाजे गटाला राजकीय बळ; भारत कोकाटे विजयी