Lata Mangeshkar Death Anniversary: विश्वाचे चैतन्य लतादीदी!

भारतात जिथे-जिथे संगीत ऐकले जाते, तिथे-तिथे लतादीदींचे स्वर निनादत असतात. भारतीय संगीत संस्कृतीची ओळख जगाला लता मंगेशकरांच्या गीतांतून झाली आहे.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkaresakal

"आज लता मंगेशकर यांचा दुसरा स्मृतिदिन. दोन वर्षांपूर्वी पार्थिव देह सोडून त्या अनंतात विलीन झाल्या. म्हणजे प्रत्यक्षात आज देहरूपी लतादीदी आपल्यात नाहीत; परंतु एक क्षणही असा नाही की भारतीय रसिकांच्या विस्मृतीत त्या गेल्या. भारतात जिथे-जिथे संगीत ऐकले जाते, तिथे-तिथे लतादीदींचे स्वर निनादत असतात. भारतीय संगीत संस्कृतीची ओळख जगाला लता मंगेशकरांच्या गीतांतून झाली आहे."- विजयालक्ष्मी मणेरीकर, नाशिक

(latest marathi article on Lata Mangeshkar Memorial Day nashik news)

साहित्यरत्न पु. ल. देशपांडे यांनी १९८९ च्या जागतिक मराठी परिषदेत लतादीदींबद्दल गौरवोद्‍गार काढले होते, “मला जर एखाद्याने विचारलं, की आकाशात देव आहे का? तर मी सांगेन देव आहे की नाही, मला माहीत नाही.

मात्र, या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही, क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठे जात असतो.”

मंगेशकर कुटुंबाचे मुख्य प्रेरणास्रोत म्हणजे लतादीदी. सूर्य जसा उगवतानाच स्वतःच्या तेजाचे वलय आसमंतात पसरवितो, त्या वलयाच्या आभेने विश्वात चैतन्य निर्माण होते, ते चैतन्य म्हणजे लतादीदी.

आपलं श्वास घेणं-सोडणं हे जितकं सहज आहे, तितकं सहज त्यांच्या सूरांचं गारुड आपल्या अंतरंगात वसलेलं आहे. मंगेशकर कुटुंबीयांकडे पाहता एकच सत्य भासते, ते म्हणजे त्यांच्यातील एकसंघता. त्यांचं प्रत्येक कार्य त्यांनी म्हणजे त्या पंचरत्नांनी (लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ) मिळून केलेलं आहे.

मग ‘जैत रे जैत’ किंवा ‘लेकीन’ त्याला अपवाद कसा असेल? मला वाटते, ही संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांची निर्मिती आहे. चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती ऐकल्यावर लक्षात येते, की ‘लता मंगेशकर’ हे सप्ताक्षरी सूरच या निर्मितीमागचा मुख्य प्रेरणास्रोत आहे.

त्यांच्याविषयी माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीने काही लिहावे, ही माझी योग्यताच नाही. त्यांच्याबद्दल पं. हृदयनाथ मंगेशकर (त्यांचे लहान बंधू व चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक) यांनी स्वतः एक लेख लिहिला होता, तो मी जसाच्या तसा इथे देत आहे.

कविवर्य ग्रेस यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल एक कविता लिहिलेली होती. त्या कवितेचे विश्लेषण पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या लेखात केले आहे.

माहेराहून गलबत आले

मला सखीचे स्वप्न पडे

हृदयामधल्या गुपितांमध्ये

निशिगंधाचे फूल पडे

अंतर्ज्ञानी युगाप्रमाणे

शब्द परतले घरोघरी

जडबंधाच्या मिठीत रुसली

चैतन्याची खुळी परी

या वाटेवर रघुपती आहे

त्या वाटेवर असे शिळा

सांग साजणी कुठे ठेवू मी

तुझा उमलता गळा?

‘माहेराहून गलबत आले’ ही लतादीदींवर लिहिलेली कविता आहे. या कवितेत लेबनान कवी खलील जिब्रानचा एक संदर्भ दिलेला आहे. कवी ग्रेस यांचे एक वैशिष्ट्य आहे, जुने संदर्भ दाखले रूपकाच्या सहाय्याने ते कवितेत मांडतात! ते एक प्रतिभावंत कवी होते.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Death Anniversary : लता दीदींच्या नावावर असलेले विक्रम माहितीये? ३६ भाषांमध्ये त्यांनी तब्बल...

हे सांगायला जिब्रानची साक्ष इथे या कवितेत आपोआप मिळते. प्रेषित (द प्रोफेट) हे वाचले, की खलील जिब्रानला जहाज कुणी पाठविले होते, ते सुज्ञास आपोआप उमगते.

खलील जिब्रान बरेच दिवस एका गावात अज्ञातवासात होता. अचानक समुद्रकिनारी गलबत आले. जिब्रान जायला निघाला, तेव्हा गावकरी भानावर आले आणि त्यांना जाणवले की किती मोठा प्रेषित आपल्यात राहत होता, आपल्याला कळलेच नाही.

तर गोष्ट अशी आहे, की किनाऱ्यावर जिब्रान वाट पाहत उभा होता. गावकरी म्हणाले “तुला जावं लागतंय तर जा; पण आमच्या काही प्रश्नांची उत्तरे दे. जिब्रानने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, गावकरी उदास मनाने घरी गेले, कारण प्रेषित गलबतावर चढला होता. जिब्रानने प्रेषिताचं हे रूपक मांडले, तेच रूपक ग्रेसने कवितेच्या प्रारंभी मांडले आहे.

अहिंल्ये शिळा राघवे मुक्त केली ।

पदस्पर्शे पावन होऊन गेली ।।

- समर्थ रामदास

ही प्राचीन कथा लतादीदींच्या गानकलेबद्दल मांडली आहे. जड चैतन्याबद्दल उच्च कलाकार नेहमी आपली कला, कलानिर्मिती अपार्थिवतेत सादर करीत असतो. जडबंधाची मिठी, चैतन्याची परी या सर्व उपमा अपार्थिव कला याला उद्देशून आहेत.

माहेराहून गलबत आले. याला एक आध्यात्मिक संदर्भ आहे. जनाबाई म्हणते, ‘जल्मीच्या माहेराला येते मी विठ्ठला’

भारतीय अभिजात संगीतातील असा एकही प्रकार नाही, जो त्यांनी गायलेला नाही. लंडन येथील अल्बर्ट हॉलमध्ये सर्वप्रथम पहिली संगीत मैफल करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत.

चीन युद्धानंतर बांगलादेश येथे जाऊन सैनिकाचा वा क्रांतिकारकाचा अभिनिवेश अंगात भिनवून स्फोटक वातावरणात बॉम्बहल्ल्याच्या न विझलेल्या विस्तवाच्या धगीत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी न डगमगता गाण्याचा कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत.

भारतातील सगळ्याच भाषांमधल्या गीते गायलेल्या, सर्वांत जास्त गीते गायलेल्या, सर्वांत अधिक रेकॉर्डिंग केलेल्या त्या पहिल्या भारतीय आणि एकमेव कलाकार आहेत. सर्व भारतीय अशा महान गायिकेस माता सरस्वती मानून मनोमन त्यांची पूजा करतात.

त्यांच्यामुळे घरोघरी सूरांची मंदिरे उभी राहिलेली आहेत आणि रसिकांच्या मनमंदिरात त्यांची मूर्ती आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वास त्यांच्या स्मृतिदिनी माझे कोटी-कोटी प्रणाम.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar: "मेरी आवाज ही पहचान है..."; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची 'ही' सदाबहार गाणी नक्की ऐका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com