(पान ४ ला ॲंकर)
KPD26B13592
कापडणे : शेतकरी पितांबर पाटील यांच्या शेतात लिंबूची प्रतवारी करतांना शेतमजूर महिला.
-------
किरकोळ बाजारात लिंबू शंभरावर
दीपपर्वात लिंबू उत्पादकांना अच्छे दिन; दुष्काळात दिलासा
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ३ : खानदेशात सण- उत्सव आणि लग्नसराईच्या तोंडावर लिंबूच्या दराने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीत किरकोळ बाजारात लिंबू प्रतिकिलो शंभरीपार गेला आहे. एका लिंबासाठी आठ ते दहा रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारातही ७० ते ११० रुपये किलो दर मिळत आहे.
खानदेशात लिंबू बागायतीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे लिंबू उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. आवक घटल्याने दरात झपाट्याने वाढ झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने स्थानिक उत्पादन घटले असून, मागणी पूर्ण करण्यासाठी आंध्र प्रदेशातून लिंबूची आवक सुरू आहे. दर नियंत्रणात येत नाहीत. हॉटेल, खानावळ, ज्यूस सेंटर आणि घरगुती वापरामुळे मागणी कायम आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दोन ते तीन रुपयांना मिळणारे लिंबू थेट दहा रुपयांवर पोहोचले आहेत. घाऊक बाजारात १२ लिंबांना ८० ते १०० रुपये, तर मोठ्या आकाराच्या लिंबाला २०० ते ३०० रुपयांपर्यंत दर आहे. दुष्काळात इतर पिके वाया गेली आहेत. लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मात्र या दरवाढीने गारवा दिला आहे. हस्त बहरातील लिंबाला उन्हाळ्यात ५० ते १०० रुपये किलो दर मिळतो. हा सर्वात फायदेशीर हंगाम मानला जातो. सध्या हस्त बहरालाही दराने मागे टाकले आहे.
------
लिंबू उत्पादक गावे
धुळे जिल्ह्यात धनूर, कापडणे, न्याहळोद, लामकानी, शिरडाणे, कुसूंबा, नेर, खेडे, मुकटी, आर्वी परीसरातील बागायतदार शेतकरी लिंबू बागायतीकडे वळले आहेत. त्यांच्या बागांना दुष्काळाचा तीव्र फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.
-----
पाच महिन्यातील सरासरी दर (प्रतिकिलो)
जून--------३५ ते ४५
जुलै--------४५ ते ६०
ऑगस्ट-----६० ते ८०
सप्टेंबर-----८० ते ९०
ऑक्टोबर---९० ते ११०