बिर्याणी कमी वाढल्याने केला मित्राचा खुन; एकास जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

बिर्याणी कमी वाढल्याने केला मित्राचा खुन; एकास जन्मठेप

मालेगाव (जि. नाशिक) : बिर्याणी कमी का वाढली याचा जाब विचारला असता, सर्व बिर्याणी तूच खाताे का, असे बोलण्याचा राग आल्याने मित्राच्या डोक्यात, तोंडावर व गुप्तांगावर फावड्याने जबर मारहाण करून त्याचा खून (Murder) केल्याच्या आरोपावरून कांतिलाल शेळके (४५, रा. समर्थनगर, गंगापूर, जि. औरंगाबाद) याला येथील न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (life imprisonment to Murderer of friend due to gave less biryani Nashik Crime News)

दरम्यान, या खून प्रकरणातील दुसरा संशयित हरिभाऊ वाघ (रा. सौंदाणे, ता. मालेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी हा निकाल दिला.

बागलाण तालुक्यातील कऱ्हे शिवारात सरा डोंगराच्या पायथ्याशी ७ जानेवारी २०१७ ला हा प्रकार घडला होता. कांतिलाल शेळके, हरिभाऊ वाघ, शंकर डगळे (रा. पिंपळद, घोटी) व निवृत्ती ऊर्फ विशाल विटेकर (रा. सिडको, म्हाडा कॉलनी, नाशिक) योगेश मांडवडे यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण करताना कांतिलाल याने विशालला मला बिर्याणी कमी का वाढली, अशी विचारणा केली. त्यावर तूच सर्व बिर्याणी खातो का, असे विशालने सांगितले. त्याचा राग आल्याने कांतिलालने तुझा बेत पाहतो, असे म्हणत विहीर खोदकामाच्या लोखंडी फावड्याने (shovel) विशालच्या डोक्यात, तोंडावर व गुप्तांगावर जबर मारहाण करून त्याचा खून केला.

सटाणा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून खटला न्यायालयात पाठविला. न्यायाधीश बहाळकर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. अशोक पगारे यांनी आठ साक्षीदार तपासले. सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. ए. मगर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. कांतिलालविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर हरिभाऊ वाघ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.