ब्रेक फेल झाल्याने कोसळली लिफ्ट
विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून सातपूरला तपासणी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १३ : लिफ्ट कोसळून महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १०) रात्री सातपूर परिसरात घडली होती. घटनेची दखल घेत विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून घटनास्थळी भेट देत तपासणी करण्यात आली. लिफ्टचा ब्रेक फेल झाल्याने घटना घडल्याची प्राथमिक माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. देखभाल दुरुस्ती करणारा मक्तेदार शहराबाहेर असल्याने ते परतल्यानंतर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाच्या अधिकारी राजश्री गीते यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री सनशाइन अपार्टमेंटच्या टेरेसवर फटाक्यांमुळे आग लागली होती. भीतीपोटी अपार्टमेंटमधील रहिवासी लिफ्टमधून खाली येत असताना अचानक लिफ्ट कोसळण्याची घटना घडली. त्यात एक महिला जखमी झाली. विद्युत निरीक्षण कार्यालयास घटनेची माहिती मिळताच विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अपघातग्रस्त लिफ्टची तपासणी करण्यात आली. रहिवाशांकडून माहिती घेण्यात आली. संबंधित मुक्तदाराची दुरुस्तीबाबत अधिक चौकशी करण्यात करण्यात येणार आहे. ते बाहेरगावी असल्याने शहरात परतताच त्यांची चौकशी करून घटना घडण्याचे कारण काय आहे. याची माहिती घेण्यात येणार आहे. वर्षातून एकदा तरी लिफ्टचे विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून तपासणी करून देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. असे असताना बहुतांशी अपार्टमेंट आणि सोसायटी सदस्य तसेच पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतात. वर्षानुवर्ष देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहे. विभागाकडे ११ हजार ८८६ लिफ्टची नोंदणी आहे. त्यापैकी अनेक लिफ्टचा विनातपासणी वापर सुरू आहे. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून दरवर्षी लिफ्टची तपासणी करणे अनिवार्य आहे. लिफ्ट तपासणीची विभागाचे शुल्क अत्यल्प आहे. ३० मजली इमारतीपर्यंत केवळ सहाशे रुपये तर त्यापेक्षा अधिक मजली इमारतीसाठी १ हजार ५०० रुपये शासकीय शुल्क आकारले जाते. अशा घटना टाळण्यासाठी विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून तपासणी करण्यात आलेल्या आणि दुरुस्तीची आवश्यक असलेल्या अशा २० ते ३० गृहनिर्माण संस्थांना लिफ्ट दुरुस्ती करून घेण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहे. तसेच नियमित तपासणी केली जात असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.