esakal | दसरा-दिवाळीच्या उलाढालीची आस! कोरोना धक्क्यातून सावरतंय 'मालेगाव' शहर
sakal

बोलून बातमी शोधा

loom industry

दसरा-दिवाळीच्या उलाढालीची आस! कोरोना धक्क्यातून सावरतंय शहर

sakal_logo
By
गोकुळ खैरनार

मालेगाव (जि.नाशिक) : कोरोनामुळे (coronavirus) गेल्या दीड वर्षापासून हेलकावे खात असलेल्या यंत्रमाग व्यवसायाला दसरा-दिवाळीच्या उलाढालीची आस लागून आहे. देशांतर्गत कोरोना रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. व्यवहार व जनजीवन सुरळीत झाल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या सणासाठी तयार मालाला मागणी वाढू लागल्याने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यातच सुताचे भाव किलोमागे २० रुपयांनी कमी झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: जायकवाडीचे पाणी बिअर उत्पादनासाठी! 'त्या' अटीला जलचिंतनचा आक्षेप

कोरोनाच्या धक्क्यातून सावरतेय मालेगाव शहर

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका यंत्रमाग व्यवसायालाही बसला. देशभरातील मंदिरे, सार्वजनिक लग्नसोहळे, कार्यक्रम, सण-उत्सव साधेपणाने साजरे झाले. त्यामुळे बाजारात कपड्यांना मागणी नव्हती. परिणामी मालेगावसह अनेक ठिकाणी अधून-मधून यंत्रमागाचा खडखडाट बंद होत गेला. दोन महिन्यापूर्वी शहरातील यंत्रमाग आठ ते दहा दिवस बंद ठेवण्यात आले होते. या उद्योगाशी निगडीत लाखो कामगार परिस्थितीशी झगडत आहेत. कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. कापड बाजारही झळाळी घेऊ लागला आहे.

सत्ता टक्के यंत्रमाग जोरात

आगामी दसरा-दिवाळीच्या घाऊक खरेदीला लहान-मोठ्या दुकानदारांनी सुरुवात केली आहे. गोदामातील तयार माल विकला जाऊ लागल्याने उत्पादकांचा जीव भांड्यात पडला आहे. आर्थिक उलाढालीमुळे चलन फिरू लागले आहे. सहा महिन्यापूर्वी उत्पादकांना प्रतिमीटर दीड ते दोन रुपये नुकसान सहन करावे लागत होते. सध्या सुताचे भावही २० रुपयांनी कमी झाल्याने २६० रुपये किलोने मिळणारे सूत २४० रुपयापर्यंत मिळत आहे. याचा परिणाम उत्पादन वाढीवर झाला आहे. मालेगावातील ७० टक्के यंत्रमाग जोमात सुरू आहेत. सणासुदीच्या दिवसात कोरोना नियंत्रणात आल्यास बाजारपेठेतील मालाला मागणी वाढून यंत्रमाग व्यवसायाला बळकटी मिळू शकेल.

केंद्र शासनाने यंत्रमाग उद्योगाबाबत ठोस धोरण आखले पाहिजे. भारतातून सूत बांग्लादेशला जाते. सध्या कापड निर्यातीत बांग्लादेश आघाडीवर आहे. शासनाने यंत्रमाग उद्योजकांना माफक दरात कर्जपुरवठा करावा. व्यवसाय टिकून राहील अशा स्वरुपाचे विजेचे दर ठरवावेत. देशपातळीवर या संदर्भात धोरण ठरवून यंत्रमागाला दिलासा द्यावा. - युसूफ इलियास, अध्यक्ष, पॉवरलुम ॲक्शन कमिटी मालेगाव

हेही वाचा: नाशिक : महापालिकेने नाकारली 348 गणेश मंडळांची परवानगी

loading image
go to top