कमी व्याजदराच्या आमिषाने ५० लाखांना गंडा
अंबड पोलिसात गुन्हा दाखल; दोन कोटींचे आमिष
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : व्यावसायिकांना अवघ्या ५ टक्के वार्षिक व्याजाने दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून, ५ वर्षांचे व्याज आगाऊ घेण्याच्या बहाण्याने तब्बल ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तीन भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज यशवंत माळवी (रा. जळगाव), दिलीप पांडुरंग वानखेडे आणि त्याचा मुलगा शुभम दिलीप वानखेडे (दोघे रा. गजानन नगर, डाबकी रोड, अकोला) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर संजय माणिकलाल भावसार (वय ६०, रा. बालाजी व्हिला, काशिकोनगर, सदगुरुनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार कर्ज देण्यापूर्वी ५ वर्षांचे व्याज एकरकमी जमा करावे लागेल, अशी अट संशयितांनी घातली. त्यानुसार संजय भावसार, विशाल भावसार आणि अभिजित भावसार यांनी दिलीप वानखेडे याच्या ॲक्सिस बँकेच्या इंदिरानगर (नाशिक) शाखेतील खात्यावर आरटीजीएस, ऑनलाइन आणि रोख स्वरूपात टप्प्याटप्प्याने एकूण ५० लाख रुपये वर्ग केले. पैसे मिळाल्यानंतर संशयितांनी शुभम पतसंस्थेचा एक कोरा चेक दाखवून २० दिवसांत २ कोटी रुपये खात्यावर जमा होतील असे सांगून काढता पाय घेतला. ठरलेला कालावधी उलटून गेल्यानंतरही कर्जाची रक्कम खात्यावर जमा न झाल्याने भावसार यांनी संशयितांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतसंस्थेचे ऑडिट सुरू असल्याचे सांगत संशयित टाळाटाळ करू लागले व नंतर त्यांनी फोन उचलणेच बंद केले. संशय अनावर झाल्याने भावसार व त्यांचे नातेवाईक अकोला येथे वानखेडे याच्या घरी गेले असता तेथे कोणीही मिळून आले नाही. तसेच, आसपासच्या परिसरात चौकशी केली असता वानखेडे आणि त्याचा मुलगा अनेक लोकांची अशाच प्रकारे फसवणूक करत असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर बारशिले पुढील तपास करत आहेत.