
LPG Cylinder Rate Hike : वाढत्या किमतीमुळे गॅस सिलिंडर सोडून गरिबांच्या घरात पुन्हा पेटली चूल!
मनमाड (जि.नाशिक) : धूरमुक्त गावाचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.
मात्र जसे जसे गॅसच्या किमती वाढत गेल्या. गॅस सिलिंडर रिफिल करणे गरिबांना परवडत नसल्याने आणि वाढलेली महागाई पाहता ग्रामीण भागातील गरीब महिलांच्या घरात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. (LPG Cylinder Rate Hike nashik news)
प्रत्येक कुटुंबात स्वयंपाक करताना घर धूरमुक्त व्हावे, गरीब महिलांना स्वयंपाक करताना त्रास होवू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना २०१६ पासून सुरू केली.
या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कुटुंब, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी, जंगल प्रभावित कुटुंब, अति मागासप्रवर्ग, नदी काठालगतचे कुटुंब यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या निर्माण होते.
तसेच यासाठी वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषणात सुद्धा वाढ होत होती. स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये श्वसनाच्या आजार होण्याची शक्यता असते.
हे सर्व टाळण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. मात्र सध्या महागाईचा भडका उडत असल्याने जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढले आहे.
या महागाईचा फटका सिलिंडरलाही बसला असून सिलिंडरची किंमत प्रती सिलिंडर एक हजार १०० रुपयांपर्यंत गेली आहे. यातच शासनाकडून दिली जाणारी सबसिडी काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
धूरमुक्त गाव योजनेचा विसर
गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे ग्रामीण भागातील महिलांना दर महिन्याला गॅस सिलिंडर रिफिल करणे परवडत नसल्याने त्या पुन्हा चुलीकडे वळल्या आहे. यामुळे पुन्हा ग्रामीण भागात स्वयंपाकगृहातून धूर निघताना दिसत आहे.
त्यामुळे शासनाच्या 'धूरमुक्त गाव योजने' चा धुव्वा उडू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागात सिलिंडरचा वापर वाढला होता. त्यामुळे घरोघरी चुली पेटविल्या जात नव्हत्या, तर काही चुली घरातूनच हद्दपार झाल्या होत्या. मात्र सध्या ग्रामीण भागात सरपण गोळा करून ठेवण्याची वेळ आली आहे.
आर्थिक बजेट कोलमडले
ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाचे आर्थिक बजेट बिघडले आहे. अवकाळी पाऊस, नापिक, कर्जाचा डोंगर, बँकांची वसुली, वीजबिल वसुली याची अगोदरच गरीब कुटुंबे हवालदिल झाले आहे. अशात सिलेंडरचा भाव गगनाला पोचल्यामुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे.
"उज्ज्वला गॅस योजनेत घरगुती गॅस मिळाला आहे. जोपर्यंत सिलिंडरचे भाव कमी होते तोपर्यंत सिलिंडर घेतले पण आता भाव वाढल्यामुळे सिलिंडर परवडत नाही. त्यामुळे सरपण घेऊन चूल पेटवावी लागत आहे." - चहाबाई सानप, गृहिणी