Nashik : महाज्योतीमुळे शिक्षण आधुनिकीकरणाला मिळणार चालना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chagan Bhujbal

महाज्योतीमुळे शिक्षण आधुनिकीकरणाला मिळणार चालना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्पर्धेच्या काळात इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थेतर्फे आधुनिक शिक्षणासाठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाज्योती संस्थेतर्फे १२२ विद्यार्थ्यांना श्री. भुजबळ यांच्या हस्ते टॅब वाटप झाले. महाज्योती संस्थेचे संचालक प्रा. दिवाकर गमे, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी महाज्योती संस्थेने प्रयत्न करावेत. महाज्योती, बार्टी, सारथी, तार्ती अशा संस्थांना समानतेने सहकार्य करण्यात येईल. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक क्रांतीच्या इतिहासाचा अभ्यासातून विद्यार्थ्यांनी वाटचाल केल्यास देशाची देखील प्रगती होईल. महाज्योतीच्या विभागीय कार्यालयाला सामाजिक न्याय व जिल्हा प्रशासनाने जागा व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.

महाज्योतीच्या माध्यमातून गोर गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तत्पूर्वी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील १२२ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात तनुजा भालेराव, नंदिनी वाकारे, गायत्री पुंड, दानीज शेख, सूरज परदेशी व रोहिणी मिस्त्री या विद्यार्थ्यांना श्री. भुजबळ यांच्या हस्ते टॅबचे वाटण्यात आले. प्रा. गमे यांनी प्रास्ताविक केले.

loading image
go to top